शिंदे सरकार घेणार नवा निर्णय; दहीहंडीला मिळणार सार्वजनिक सुट्टी?

काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात. पण मी मुख्यसचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना देणार आहे...

शिंदे सरकार घेणार नवा निर्णय; दहीहंडीला मिळणार सार्वजनिक सुट्टी?

 राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णयांचा सपाटा लावला आहे. अवघ्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 पेक्षा जास्त जीआर काढले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आता आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. तसे पत्र सचिवांना देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात. पण मी मुख्यसचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना देणार आहे ” , असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले . तसेच गणेशोत्सव आणि दहिहंडीवर ह्यावर्षी कोणतेही निर्बंध नसतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी केली आहे . त्याचबरोबर गोविंदांना दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत असलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचदरम्यान शिंदे गटातील प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करावे आणि दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी, यासाठी प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले होते. त्यांच्या याच निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या सचिवांना दिल्या आहेत.

Exit mobile version