आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर: CM Eknath Shinde

आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर: CM Eknath Shinde
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (मंगळवार, १७ सप्टेंबर) भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. “राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च  प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी  रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “तुम्ही सगळे डॉक्टर सामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतात. अडीच वर्षांपूर्वी आमचं सरकार आलं तेव्हापासून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आलो आहोत. आरोग्याच्या क्षेत्रातही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले आहेत. राज्यातील सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर आमचा भर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ५ हजार रुपये दरमहा सुधारित मानधन देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे.”
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की,  “सद्यस्थितीमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बाहयरुग्ण विभाग, कक्ष, आय.सी.यु. शस्त्रक्रियागृहे इत्यादी सेवा युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डियॉलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा प्रकराच्या अतिविशेषोपचार सेवा सुरु केलेल्या आहेत. यासेवेचा लाभ मराठवाडयासह बुलढाणा, वाशिम, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर अशा एकूण १४ जिल्ह्यामधून येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना फायदा होत आहे.
घाटी रुग्णालयाचा  मराठवाड्यातील लाखो रुग्णांना फायदा होतोय. ज्यावेळी हे महाविद्यालय सुरु झाले त्यावेळी फक्त ५० विद्यार्थी क्षमता होती व रुग्णखाटांची संख्या ३०० होती. आता विद्यार्थी क्षमता २०० इतकी झालेली आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत राज्य कर्करोग संस्थाही कार्यान्वित आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून डॉक्टर रुग्णांना जीवदान देण्याचे काम करतात. रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुंटूबियांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम डॉक्टर करतात. त्यामुळे शासन डॉक्टरांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य देत आहे.  सुपरस्पेशॅलीटी सर्जिकल हॉस्पीटलसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र प्राप्त होताच गरजूंना तात्काळ निधी देण्यात येत असून राज्यात दोन वर्षात 350 कोटी रुपये गरजू रुग्णांना उपचारासाठी देण्यात आले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दिड लाखावरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. आपले राज्य आरोग्य सेवेत अधिक प्रगत कसे करता येईल यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून डॉक्टरांच्या मागण्या तत्परतेने पूर्ण करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version