कंत्राटी बेस्ट कर्मचारी संपावर; दिवाळी गोड करण्याची मागणी

कंत्राटी बेस्ट कर्मचारी संपावर; दिवाळी गोड करण्याची मागणी

मुंबईतील सांताक्रुझ बेस्ट बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांना ऐन सणासुदीत त्रास सहन करावा लागत आहे. तर पगारवाढ आणि दिवाळी बोनस न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचंही या संपकऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे पश्चिम उपनगरात दिवाळीसाठी आणि आता कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सांताक्रूज बेस्ट डेपोमध्ये ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पहाटे कामावर रुजू न होता बोनसच्या मुद्द्यावरुन संप पुकारत असल्याची घोषणा केली. नेहमीप्रमाणे पहाटच्या शिफ्टसाठी कामगार बस डेपोमध्ये आले मात्र एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. “आम्हाला पगार जेवढा सांगितलेला तो पूर्णपणे मिळत नाही. आम्ही सुट्ट्यांना पण काम करतो त्याचा पगारही मिळत नाही. सामान्यपणे सुट्ट्यांच्या दिवशी काम केल्यावर दुप्पट पगार मिळतो. मात्र आम्हाला आहे तो पगारही दिला जात नाही. तसेच आम्हाला तिकीटही मोफत नाही,” असं संपकरी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच दिवाळी बोनसही मिळालेला नसल्याचं सांगतानाच अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कबूल केलेलं वेतनही मिळत नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार चालकांना २३ हजार पागर सांगून १८ हजार पगार दिला जात आहे. त्यामुळेच आमची पगारवाढ झाली पाहिजे अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. वाहक म्हणजेच कंडक्टरला १८ हजार ५०० रुपये पगार सांगितलेला. मात्र हातात १२ हजार ६०० पगार येतो. नोकरी देताना सहा तास काम करायचं सांगितलं होतं मात्र काम आठ तासांहून अधिक होते. त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही अशी तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. रोज सांताक्रुझ बस डेपोमधून १०० बस सुटतात. मात्र आज या संपामुळे अद्याप एकही बस येथून सुटलेली नाही. सध्या वरिष्ठ अधिकारी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. मात्र पहाटे पाचपासून संप सुरु असतानाच साडेतीन तासांनंतर अधिकाऱ्यांना जाग आल्याचा आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार; उद्योगमंत्री

मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात; घाटात बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version