पालघरमध्ये आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू, पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रिया

देशात स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव उत्साहात सुरु असताना मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पालघरमध्ये आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू, पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रिया

देशात स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव उत्साहात सुरु असताना मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

पालघरमध्ये सोयीसुविधांच्या अभावामुळे दोन जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. परंतु आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या गावातील ही दुसरी घटना आहे. रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती. मोखाडा तालुक्यात अशी अनेक गावं आहेत ज्यात सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

या सर्व प्रकरणी भाजपच्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘एबीपी माझामुळे खूप दुर्दैवी बातमी पाहिली पालघर मोखाडा या आदिवासी भागात एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला कारण गावात रस्ता नाही. गरिबांच्या गरजा आणि जिवाची लढाई आजही कठीण आहे. अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकासरूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख आणि दुर्दैवी वाटलं.’

पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांना अजूनही रस्ताच नाही, तर मग ऍम्ब्युलन्स येणार तरी कुठून? ग्रामस्थ ऍम्ब्युलन्सची वाट न पाहता वर्षानुवर्षे रुग्णांना, गरोदर महिलांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी झोळीचा आधार घेतात. रुग्ण महिलेला डोलीत किंवा झोळी ठेवून दवाखान्यात पोहोचवावं लागतं. परंतु ऐन पावसाळ्यात मरकटवाडीमध्ये गर्भवतीला डोलीतून नेण्याची वेळ आली आणि तिला तिच्या जुळ्या बाळांना गमवावं लागलं. दरम्यान जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यातील गरोदर महिलांना प्रसुतीची वेळ, तारीख जवळ आली की तालुक्याच्या ठिकाणी, त्यांच्या नातेवाईकांकडे येऊन थांबावं लागतं.

 

हे ही वाचा :-

५१३ किलो ड्रग्ज जप्त, गुजरातमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार, नाना पाटोले

Exit mobile version