डुप्लिकेट एकनाथ शिंदेंवर पुण्यात गुन्हा दाखल

डुप्लिकेट एकनाथ शिंदेंवर पुण्यात गुन्हा दाखल

महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लीकेट म्हणून नावरुपाला आलेले विजय माने हे सध्या अडचणीत सापडले आहेत. पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याच्यासोबतचे त्यांची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादाला आता चांगलेच तोंड फुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने विजय माने (Vijay Mane) हे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे (Asim Sarode) हे विजय मानेंच्या मदतीला धावून गेले आहेत.

विजय नंदकुमार माने हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सारखा दिसतो यामध्ये त्याचा काहीही दोष नाही. तो एकनाथ शिंदेच्या सारखा दिसतो याचा त्याने गैरफायदा घेतला असेल, मीच एकनाथ शिंदे आहे असे म्हणून कुणाची फसवणूक केली असेल तर तो गुन्हा ठरू शकतो व तशी तक्रार ज्याची फसवणूक झाली असेल त्या व्यक्तीने देणे आवश्यक आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुबेहूब दिसणारा विजय माने अल्पकालावधीत महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. मात्र आता विजय माने यांचे सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरु आहे.

विजय माने म्हणाले की, मी शरद मोहोळ याला ओळखत नाही. मला माहीत नसताना माझे नकळत फोटो काढले गेले, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी मुख्यमंत्र्यांची कधी बदनामी केलेली नाही, समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी अशी कोणतीही भावना नाही की मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का लागेल, तरी मला सर्वांनी सहकार्य करावे. मुख्यमंत्री साहेबांना आणि माध्यमांना मी वेळोवेळी सांगितलं, की मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. एकनाथ शिंदे यांची प्रतिमा कधी मलिन होईल असे कार्य मी कधी केले नाही आणि करणारही नाही.

हे ही वाचा:

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

दसरा मेळावा वादात आता राऊतांची उडी, दिला मोलाचा सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version