कोकणकरांसाठी आता रेल्वेमहामंडळानंतर लालपरीच्या फेऱ्यासुद्धा वाढवणार

कोकणकरांसाठी आता रेल्वेमहामंडळानंतर लालपरीच्या फेऱ्यासुद्धा वाढवणार

काय कोकण कारांनु गणपतीक गावाक जगलास ना ? मगे तुमच्यासाठी एक चांगली बातमी इली हा .. यंदाच्या गणपतीक ४३०० ज्यादा गाड्या सोडून येत हत. आता गणपती म्हंटल तर कोकणचे चाकरमानी कोकणात गेले नाहीत किंवा जाणार नाहीत असं होऊच शकत नाही. काहीही झालं तरी गणपतीच्या दिवसात मुंबईतील कोकणी चाकरमानी हे जास्तीत जास्त अगदीच जमत नाही आहे तर २ किंवा ३ दिवसांसाठी वेळ काढतील, सुट्टी घेतील तरीसुद्धा ते जाणारच. त्यामुळे त्या काळात बसेस आणि रेल्वेचे आरक्षण मिळणेही अवघड असते. अनेकांना खासगी गाड्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यंदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गावी जाण्याचे वेध चाकरमान्यांना लागले आहे. त्यांच्यासाठी रेल्वेने २७८ स्पेशल रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. एसटी महामंडळाने २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने तयारी केली आहे. यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

मागील वर्षी किती बस सोडण्यात आल्या होत्या ?

गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.

Exit mobile version