Ganeshotsav 2024: ST कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक; ऐन गणेशोत्सवात भक्तांची होणार कोंडी?

Ganeshotsav 2024: ST कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक; ऐन गणेशोत्सवात भक्तांची होणार कोंडी?

गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात (Konkan) जातात. यासाठी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्याआधीच गाड्यांचे बुकिंग करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. मात्र अनेकवेळ रांगेत उभे राहूनही अनेकांना आरक्षण मिळत नाही, यासाठी दरवर्षी मध्य रेल्वेकडून (Central Railway) विशेष गाड्या सोडण्यात येतात. तसेच एसटीची पण सोय करण्यात येत असते. पण आता ऐन गणेशोत्सवाला अवघे तीन ते चार दिवस शिल्लक असतांना एसटीकडून संप पुकारण्यात आला आहे.

मुंबईसह अनेक शहरांमधील हजारो चाकरमानी गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकणातील गावी जातात. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी विभागाकडून कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. गणेशोत्सवामध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने एसटी महामंडळाकडून नियोजन करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. गणपतीच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी सोडल्या जातात. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासोबतच, कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी सुद्धा एसटी प्रशासनाने आवाहन केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय? 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घर भाडे भत्ता आणि फरक, वेतन वाढीच्या दराचा फरक याशिवाय नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार 5 हजार चार हजार आणि अडीच हजार या रकमे ऐवजी सरसकट 5000 रुपये मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

गणोशोत्सवासाठी २० विशेष रेल्वे 

चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून (Central Railway) दरवर्षी गणेशोत्सवामध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी बोरीवलीहून थेट कोकणात जाण्याकरता नवी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई येथील उपनगरात राहणार्‍या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे.

Exit mobile version