अकोल्यात मृत तरुण तिरडीवर उठून बसला; समोर आलं धक्कादायक कारण…

अकोल्यात मृत तरुण तिरडीवर उठून बसला; समोर आलं धक्कादायक कारण…

एखादा व्यक्ती मृत झाल्यावर आजकाल समाजमाध्यमांवर त्याच्या नावाचे स्टेटस ठेवण्याची फॅशन आली आहे. पण आपण एखाद्या व्यक्ती मृत झाली म्हणून असे स्टेटस ठेवायचो आणि तो व्यक्ती खरंच तिरडीवरून उठून जिवंत परत आला तर? किती मोठा धक्का बसेल ना? अशीच घटना घडलीये अकोला येथे. अकोल्यातील एका २१ वर्षीय तरुणाला तो मृत झाल्याचे समजून घरच्यांनी स्मशानात अंत्यसंस्कारासाठी नेले आणि तो खरोखरच जिवंत होता आणि तिरडीवरून उठून परत आल्याची घटना घडली आहे. प्रशांत मेसरे असे या तरुणाचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला (Akola News) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत मेसरे असे जीवंत झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत हा चान्नी पोलिस स्टेशनमध्ये होमगार्ड म्हणून कार्यरत होता. पण गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर डॉक्टरांकडे देखील उपचार सुरु होते. प्रशांतच्या कुटुंबियांना त्याच्यावर कोणीतरी काळी जादू केल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी गावातील एका २१ वर्षीय कथित बाबाकडे देखील उपचार सुरु केले होते. बुधवारी प्रशांतचे कुटुंबीय त्याला बुलडाणा जिल्ह्यातील अमरापुर येथील एका देवस्थानावर दर्शनासाठी घेऊन गेले होते. त्याठिकाणी प्रशांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांनी जवळ्या खामगाव येथील एका डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी प्रशांतची तपासणी करून एक-दोन सलाईन दिल्यावर प्रशांत हा ठीक होईल असे सांगितले. त्यानंतर प्रशांतच्या कुटुंबीयांना थेट त्याला आपल्या मुळगावी विवरा येथे आणले. दुपारी अचानक प्रशांतने हालचाल करणे बंद केले. त्यामुळे कुटुंबींनी त्या मृत्यू झाल्याचे सांगितले.

प्रशांतच्या मृत्यूची बातमी गावभर पसरल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आणि शेजारी राहणाऱ्यांनी गर्दी केली. प्रशांतच्या घरासमोर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू करण्यात आली होती. तिरडी बांधून प्रशांतचा मृतदेह सरणाकडे नेत असताना त्याच्या कुटुंबीयांनी त्याला थेट बाबाच्या घरी नेले. त्यानंतर या बाबाने मंत्र उपचार सुरू केले आणि काही वेळात प्रशांत तिरडीवरच उठून बसला आणि गप्पा मारु लागला. त्यामुळे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

या घटनेनंतर बाबाने चमत्कार करून प्रशांतला जिवंत केल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. पण चान्नी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांना याप्रकरणी संशय आला. त्यांनी थेट प्रशांतच्या गावात जाऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर प्रशांतचे कुटुंबीय आणि बाबाकडे नव्हते. तसंच डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केल्याचा पुरावा देखील त्यांच्याकडे नव्हता. या सर्व गोष्टी अंधश्रध्देतून घडलेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत, त्याचे कुटुंबीय आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

हे ही वाचा :

जर मला विचाराल नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे; अनिल परब

काश्मीरच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला दिले आव्हान; गिलगिट बाल्टिस्तान भारतात येणारच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version