आरे कॉलनीत बिबट्या चा हल्ला; दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

आरे कॉलनीत बिबट्या चा हल्ला; दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मुंबईतून धक्कादायक घटना समोर येत आहे. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. इतिका अखिलेश लोट, असे या मुलीचे नाव आहे. या हल्यानंतर परिसरातील स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात. सोमवारी ( २४ ऑक्टोबर ) सकाळी ६.३० च्या सुमारास आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ मध्ये वास्तव्यास असलेले अखिलेश लोट यांची दीड वर्षाची मुलगी इतिका गायब झाली. त्यामुळे लोट कुटुंबिय आणि त्यांच्या शेजारच्या रहिवाशांनी घराच्या आसपास आणि जंगलात इतिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने घरापासून काही अंतरावर इतिका जखमी अवस्थेत सापडली. तिला तात्काळ सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केलं. ऐन दिवाळीत अशी दुर्घटना घडल्याने आरे परिसरात शोककळा पसरली आहे. दुसरीकडे आरे कॉलनीत बिबट्याचे हल्ला वाढल्याने परिसरातील स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळी मुलीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेने परिसरात भीतीचे वातावरण होते. आरे कॉलनीमध्ये बिबट्याचा अधिवास आहे. बिबट्यांचा हा नैसर्गिक अधिवास असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येते. मुंबई मेट्रो-३ च्या कारशेड काम सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याचे नैसर्गिक अधिवास असलेले ठिकाण असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येतो. या आणि इतर मुद्यांवर पर्यावरणप्रेमींकडून आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करण्यात येत होता. आरे ऐवजी इतरत्र कारशेड उभारण्याची मागणी करण्यात येत होती. आरे कॉलनीत याआधीदेखील बिबट्याने हल्ले केले आहेत. मागील काही वर्षात आरे कॉलनीत बांधकाम, अतिक्रमण वाढल्याने जंगलाचा भाग कमी झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. आरेत पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने बिबट्याचा अधिवास आणि मानवी वस्ती या मुद्यावर पुन्हा चर्चा झडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

“मी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती,” हार्दिक पांड्याने विराट कोहलीशी गप्पा मारताना मन केले मोकळे

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? – आयुष्मान खुराणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version