spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धुळ्यात उंटांची अवैध वाहतूक, शिरपूर पोलिसांकडून ४९ उंट ताब्यात

राज्यात अनेक ठिकाणी जनावरांची तस्करी केली जाते.

राज्यात अनेक ठिकाणी जनावरांची तस्करी केली जाते. पण धुळे जिह्ल्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्यात चक्क उंटांची अवैधरित्या वाहतूक करण्यात आली आहे. गुजरातमधील कच्छ येथून आणण्यात आलेले हे उंट विदर्भामध्ये नेले जात होते. गोंदियाकडे जाणाऱ्या ४९ उंटांसह २ जणांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुक्यातील विखरण गावाजवळ शिरपूर-शहदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जिह्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. तर पोलिसांनी आरोपी भोजाभाई कान्हभाई रबारी आणि बाराभाई मंगुभाई रबारी या दोघांना ताब्यात घेतले आहे.

खरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही गोरक्षकांनी त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरु केली. शोध मोहीम करत असताना त्यांना काही उंट आणि त्यांच्यासोबत दोघेंजण सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशी केल्यानंतर हे सर्व उंट कचभुज येथून आल्याचे समोर आले आहे. हे सर्व उंट ग्रामीण भागातून गोंदियाकडे जाणार होते. पोलिसांनी ९ लाख ८० हजाराचे ४९ उंट जप्त केले आहेत. तसेच हे सर्व पायी चालत जाणारे उंट कोणाला विकण्यात येणार होते याचा पोलीस तपास करत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे म्हणाले, आमच्या पोलीस पथकाला एक माहिती मिळाली होती. ज्यामध्ये गुजरातमधून कच्छ येथून विदर्भात ४९ उंट आणण्यात आले होते. त्यांची अवैध वाहतूक केली जात होती. या सर्व गोष्टीची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली. त्यावेळी त्यांना ४९ उंट आणि दोन व्यक्ती सापडले. यावेळी काही उंटाची वैद्यकीय तपासणी केली असता, ते आजारी असल्याचे समोर आले. त्यामुळे उंट आजारी असतांना देखील त्यांना एवढ्या लांब चालवून त्यांच्यावर एकप्रकारे अत्याचार करण्यात येत असल्याचे समोर आले. तसेच, हे उंट कोणत्या उद्देशाने घेऊन जात आहे याचा देखील तपास होणे गरजेचे आहे. तर, या प्रकरणी प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे, अशी पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

एसटी बँकेच्या संचालक पदावरून सौरव पाटील यांची हकालपट्टी, सदावर्तेंना मोठा धक्का

थर्टी फर्स्टला मद्य पार्टी करणाऱ्यांसाठी एक दिवसांचा दारू परवाना असणे आवश्यक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss