मनोज जरांगेंची SIT चौकशी, फेस कॉलवर काय बोलले ते उघड करतो; मनोज जरांगेंचा इशारा

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे.

मनोज जरांगेंची SIT चौकशी, फेस कॉलवर काय बोलले ते उघड करतो; मनोज जरांगेंचा इशारा

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. दोन दिवसांआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोमवारपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या मागणीनंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहेत. मी कुठेच चुकत नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असे म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करतायत. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहेत. चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणालात तर मी सलाईन घेऊन चौकशीला येतो, असे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला यावर काही बोलायचं नव्हतं. मराठा समाजासाठी मी काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं सुद्धा, सारथीला निधी दिला, शिष्यवृत्ती दिली. कर्ज दिले. मराठा समाजाबद्दल मला कोणतंही सर्टिफिकेटची गरज नाही. मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहिलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा आंदोलनाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर विधानसभाप्रमाणे विधानपरिषदेत देखील उमटले आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर हे सुद्धा आक्रमक झाले होते. प्रवीण दरेकर म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह आरोप केल्याबद्दल मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. मनोज जरांगेंनी याआधी एवढ्या सभा घेतल्या त्याचा मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

हे ही वाचा:

विदर्भात, नाशिक परिसरात अवकाळीमुळे प्रचंड नुकसान, विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंवर घणाघात, मागण्या सतत बदलत गेल्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version