spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मास्टरलिस्टची लॅाटरी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर, नव्या मनमानीने भाडेकरू प्रचंड धास्तीत

म्हाडाच्या इमारत दुरूस्ती आणि पुर्ननिर्माण मंडळातर्फे (आरआर बोर्ड) वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या उपकर प्राप्त इमारतीतील रहिवाश्यांसाठी घराचे वितरण लॅाटरीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे. गिरणी कामगारांच्या धर्तीवर होणारी ही लॅाटरी गुरूवारी दुपारपासून पार पडणार आहे. मास्टरलीस्ट प्रक्रीयेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या या लॅाटरी बाबाचच्या निर्णयाबाबत पुरेशी स्पष्टता नसतानाच अनेक मनमानी निर्णयांचे सूतोवाच या लॅाटरी प्रकरण निर्णयातून समोर येत आहेत.

‘सामान्यांच्या घरांसाठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या म्हाडाच्या बृहतसूचीवरील घर वाटपात बरेच गैरप्रकार अनेक वर्षे सुरू आहेत. त्याला खीळ बसवण्यासाठी आणि एजंटराज कमी करण्यासाठी गिरणी कामगारांच्या धर्तीवर लॅाटरी द्वारे घरे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारदर्शी कारभाराच्या नावाखाली सुरू करण्यात आलेला लॅाटरी प्रकार बनवताना सरकारच काळ्या बाजाराला वेगळ्या पध्दतीने निमंत्रण देणार असल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे. इमारत जीर्ण झाल्यामुळे किंवा विकास कामांसाठी पाडल्याने त्यातील रहिवाश्यांना ५८ संक्रमण शिबिरात पाठवण्यात येते. याठिकाणी ३५-४० वर्षे रहिवाशी वेगवेगळ्या गैरसोयींमुळे नरकयातना भोगत आहेत. आता या लॅाटरीच्या माध्यमातून या रहिवाश्यांना आपल्या मूळ परिसरात घर मिळणार नाही . त्यामुळे संक्रमण शिबीरातील नरकयातनांमधून मूळ मुंबईकरांना थेट नरकातच पाठवण्याचा डाव युती सरकारने बनवला आहे. या रहिवाश्यांना महमद अली रोड ते सायन ते माहीम पर्यंत कुठे ही घरे देण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांना घरे देतांना त्यांच्या गिरणीच्या जागेवरच घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मग मूळ भाडेकरूंच्या बाबत हा अमानुष पक्षपाती पणा का? असा प्रश्नही मूळ भाडेकरूंकडून विचारण्यात येत आहे.

म्हाडा बिल्डरांकडून अतिरिक्त चटई क्षेत्रासाठी प्रिमियम म्हणून ११० टक्के दर आकारते. पण या सामान्य मुंबईकरांच्या घरासाठी अतिरिक्त क्षेत्रफळ मिळणार नाही आणि मिळालेच तर त्यासाठी रेडी रेकनरच्यी १२५ टक्के अधिक किंमत वसूल केली जाणार आहे. म्हणजे मूळ सरकारी भावापेक्षा सव्वाशे पट अधिक रक्कम आकारुन सरकारनेच म्हाडात काळा बाजार धोरण अंमलात आणण्याचे ठरवले आहे, अशी टिका संक्रमण शिबीरीतील रहिवासी करत आहेत.

या प्रक्रियेत येणारी घरे विकासक म्हाडाला मेहेरबानी करत असल्याच्या अविर्भावात देत असतात. अत्यंत निकृष्ट दर्जाची घरे सरप्लस एरिया म्हणून यातील बहुतेक बिल्डर म्हाडाला देत असतात. म्हाडाचे अधिकारीही हात ओले करून घेत ती स्विकारत असतात. ट्रान्झिस्ट कॅम्पात ३०/४० वर्षे खितपत पडून लॅाटरीत निकृष्ट, दर्जाहीन घर लागले तर त्याचं काय करायचे याची स्पष्टताही या नव्या धोरणात नाहीत. काही इमारतीत एकाच कुटुंबाची दोन-दोन भावांची किंवा पती पत्नींची घरे आहेत. लॅाटरीत असे भाडेकरू सर्वाधिक भरडले जाणार आहेत. कारण लॅाटरीत त्यांना एकाच इमारतीत घरे न मिळता वेगवेगळ्या ठिकाणी भिरकावले जाणार आहे. या लॅाटरीतील घरे नाकारलेल्या त्या भाडेकरूला त्याचा हक्क संपला म्हणत संक्रमण शिबीरातच खितपत पडावे लागणार हा निर्णय तर युती सरकारने मूळ मुंबईकरांवर कशी मोगलाई लादलीय हे सांगणारा आहे.

म्हाडात ३०० ते ७५३ चौरस फूटांची घरे मास्टरलिस्ट वरून वितरीत करण्याचा म्हाडाचा कायदा आहे. नव्या धोरणात रहिवाश्यांना ही घरे मिळू न देता बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचा डाव आखण्यात येत आहे. तसेच काही महत्वाच्या विभागातील यातील घरे लाटण्याचा छुपा डाव नव्या कारभाऱ्यांच्या माध्यमातून साधण्याचा चंग म्हाडातील काही झारीतील शुक्राचार्यांनी आखला आहे. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपली छाप सोडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ मुंबईकरांचे अहित करणारे निर्णय घेतले जाऊ नये अशी भूमिका घेतली असताना त्यांच्याकडून मिळवलेल्या सूचनांचा ‘ध’ चा ‘मा’ करण्याचा खेळ सध्या म्हाडात मनमानी पध्दतीने सुरू आहे. मास्टरलिस्ट मध्ये असलेला एजंटाची दादागिरी मोडीत काढणे गरजेचं आहे. ही दादागिरी यातील मोजक्या एजंटांनी सर्वपक्षीय राजकीय वरदहस्तामुळे सुरू ठेवली आहे. मात्र हा नवी लॅाटरीप्रणाली आणि नव्या कारभाऱ्यांनी केलेली निर्णय प्रक्रिया म्हणजे रोगापेक्षा इलाज जीवघेणा असा प्रकार आहे.

म्हाडातील मास्टरलीस्ट हा एक शापित विभाग आहे. या विभागात अनेक अधिकाऱ्यांचे बळी गेलेत. विधानसभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्याआधी स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही या विभागासमोर हात टेकलेत. इतका हा विषय गंभीर आहे. त्यामुळे म्हाडाच्या उपाध्यक्षांनी ‘शेवाळ आलेल्या ट्रॅकवरुन मॅरेथॅान धावण्याचा प्रकार’ जो सुरू केलाय तो कोणाला जायबंदी करणार याची चर्चा सध्या म्हाडात सुरू आहे.

हे ही वाचा:

नाना पाटेकर यांची नाना रुपं; ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्यासोबत आहोत – आमदार बच्चू कडू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss