Sunday, July 7, 2024

Latest Posts

Monsoon Session: ‘गॅस’वर गेलेल्या सरकारची गॅस सिलिंडर मोफतची घोषणा

मुंबई- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या फटक्यानंतर महायुतीतील नेते गॅसवर गेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत राज्यातील प्रत्येक  कुटुंबाला  वर्षाला   तीन गॅस सिलेंडर  मोफत देण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने शेवटच्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून मतपेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महिला, तरुण, शेतकरी, सामाजिक दुर्बल घटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्पातून घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

तीन गॅस सिलेंडर  मोफत 
महिलांना खूष करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना घोषित केली. या योजनेतून वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील.  ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्य्यभूत ठरेल आणि राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबांना फायदा मिळेल. मध्यप्रदेशच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’  जाहीर केली. या योजनेच्या अंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील  पात्र महिलांना राज्य सरकारच्या वतीने महिना १ हजार ५०० रुपये देण्यात येतील.  या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

शेतक-यांची नाराजी दूर
लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यांच्या संतापाचा फटका बसला होता. त्यामुळे शेतक-यांना खूश करण्यासाठी  ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना’ जाहीर केली. त्यात राज्यातील ४४ लाख ६हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज द पुरवठा केला जाईल. त्यासाठी १४ हजार ७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss