मुंबई- ठाण्यात एकूण १२४ गोविंदा जखमी

राज्यात दहीहंडीचा उत्साह गुरुवारी दिसून आला. गोविंदा पथकाने या उत्सवासाठी महिन्याभरापासून तयारी केली होती. त्यांच्या या उत्सावात गुरुवारी सकाळपासून वरुणराजानेही हजेरी लावली. यामुळे गोविंदाचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

मुंबई- ठाण्यात एकूण १२४ गोविंदा जखमी

राज्यात दहीहंडीचा उत्साह गुरुवारी दिसून आला. गोविंदा पथकाने या उत्सवासाठी महिन्याभरापासून तयारी केली होती. त्यांच्या या उत्सावात गुरुवारी सकाळपासून वरुणराजानेही हजेरी लावली. यामुळे गोविंदाचा उत्साह द्विगुणीत झाला होता. उंचावर बांधलेली दहीहंडी फोडून लाखो रुपयांची बक्षीसे मिळवण्यासाठी गोविंदा आणि गोपिकांमध्ये चुरस लागली होती. श्वास रोखायला लावणारा थरांचा थरार सर्वत्र दिसत होता. यामुळे उत्साहपूर्ण वातावरणात पुणे, मुंबई, ठाणे शहरासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसला. बोल बजरंग बली की जय’, ‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’ अशी हाळी घालत, ठिकठिकाणच्या मानाच्या दहीहंडय़ांचा वेध घेत मुंबई – ठाण्यासह विविध शहरांमध्ये गोविंदा पथकांतील गोविंदा गुरुवारी थिरकत होते. एकीकडे उंच दहीहंडी फोडून पारितोषिक मिळविण्यासाठी पथकांमध्ये चुरस लागली होती.

दुसरीकडे चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची बांधिलकी जागवत पथके परिसरात फिरत होती. मुसळधार पावसामुळे गोविंदांचा उत्साह आणखी वाढला होता. दरम्यान, दहीहंडी फोडताना यावर्षी मुंबईमध्ये १०७ गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. तर, ३१ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, ठाण्यात १७ गोविंदा जखमी झाले. राजकीय पक्ष, नेते मंडळी, संस्था आदींनी दहिहंडीनिमित्त मुंबई, ठाण्यात मोठय़ा प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. गोविंदा पथकांनीही यंदा उंच थर रचण्याचा रात्र जागवून सराव केला होता. गोपाळकाल्याचा दिवस उजाडला तोच मुसळधार पावसाच्या हजेरीने. समस्त गोविंदा पथके पाऊस कमी होण्याची वाट पाहात होते. मात्र, पाऊस कमी होत नसल्याचे पाहून अखेर गोविंदा पथके आपापल्या परिसरातील मानाची दहीहंडी फोडून मार्गस्थ होऊ लागली. कच्छी बाजा, बेन्जो, नाशिक बाजाच्या तालावर थिरकत गोविंदा पथके परिसरात फिरत होती.

मोठी पथके उंच दहीहंडय़ा फोडण्यासाठी बसगाडय़ा, टेम्पो, दुचाकीवरून मार्गस्थ होत होती. मुसळधार पावसामुळे थर रचताना गोविंदांना अडचणी येत होत्या. तसेच मैदानांमध्ये चिखल झाल्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना पथकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक गोविंदा पथकांनी मैदानातील स्थिती पाहून तेथून काढता पाय घेतला. यंदाही ठाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर मोठय़ा रक्कमेच्या पारितोषिकांच्या दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. या दहीहंडय़ांच्या आकर्षणामुळे मुंबईतील बहुसंख्य गोविंदा पथके ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागली. परिणामी, मुंबईतून ठाण्याला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दहीहंडी फोडताना थरावरून खाली पडून १०७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये केईएम रुग्णालयामध्ये सर्वाधिक ३१ जखमींना उपचारार्थ आणले असून, त्यातील सात जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्याखालोखाल पोद्दार रुग्णालय १६ जखमींना उपचारार्थ आणले होते. त्यातील सहा जणांना रुग्णालयात दाखल केले आहेत. राजावाडी रुग्णालयात १० जण उपचारार्थ आले असून, त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.

हे ही वाचा: 

जी – २० परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात होणार दाखल

जी-२० परिषदेच्या पाहुण्यांसाठी राजधानीमध्ये शाही व्यवस्था

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version