BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उत्तर मुंबईमधील उमेदवार पियुष गोयल यांच्यावर सडेतोड शब्दांत टीका केली आहे.

BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजप (BJP), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचे उत्तर मुंबईमधील उमेदवार पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्यावर सडेतोड शब्दांत टीका केली आहे. “मुंबईतील इडी स्पेशालिस्ट उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार का?” असा थेट सवाल करत भाजपाने आता वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याचबरोबर कोरोना काळात उत्तर भारतीयांचा छळ करणाऱ्या पियुष गोयल यांना उत्तर भारतीय लोकसभा निवडणुकीत सडेतोड उत्तर देतील, अशा शब्दात पियुष गोयल यांचा समाचार त्यांनी घेतला आहे.

काल (गुरुवार, २ मे) मुंबई येथे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, मुंबई काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते उपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले की, “लोकशाही संपवण्यासाठी भाजपचे काम सुरु आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून राजकीय नेत्यांना ब्लँकमेल करण्याचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. त्यामुळे भाजपा ही ब्लॅकमेल जनता पार्टी आहे. मुंबईत यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. जाधव दाम्पत्याची आणि रवींद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. यांच्याबाबत किरीट सोमय्या आणि फडणवीस यांनी अनेकदा भाष्य केले आहे. आता मात्र हे सगळं मूग गिळून गप्प कसे? हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे उमेदवार मुंबईच्या माथी मारले जात आहेत हे दुर्दैव आहे. भाजपाचे अनीतीचं राजकारण आता संपणार आहे. कारण तसं जनमत तयार झालं आहे.”

पुढे ते म्हणाले, “मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काही उरले नाही. बँक खात्यावर येणारे १५ लाख, प्रत्येकाला घर अशा सर्व फसव्या योजना सांगून जनतेला फसवले. त्यामुळे मोदी हतबल आहेत. त्यांचे आसन डळमळीत झाले आहे. केंद्रात सत्ता जाणार या भीतीने त्यांचा थयथयाट सुरु आहे. केंद्रातल्या सरकारबरोबर राज्यातील सरकार देखील टिकणार नाही. निवडणुकीनंतर शिंदे-पवार गट कुठेही दिसणार नाहीत.”

“कोरोना काळात मोदी सरकारने जनतेचा छळ केला. मुंबईतील उत्तर भारतीयांचा छळ कोणी विसरले नाहीत. हा छळ करण्यात पियुष गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना महाविकास आघाडी सरकारने सुविधा दिल्या. पण केंद्र सरकारने त्यांना परत घरी जाण्याची सोय केली नाही. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. राज्याने दिवसाला ८० गाड्या मागितल्या. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी फक्त २० ते २५ रेल्वे गाड्या पुरवल्या आणि १२५ गाड्या तयार असल्याची थाप मारली. कोणत्याही राज्यात प्रवाशांची यादी मागितली गेली नाही पण महाराष्ट्रात मागितली गेली. महाराष्ट्राला वेठीस धरले गेले. गरीब स्थलांतरित मजूरांकडून तिकीट वसूल केले. महिलांना रेल्वे सुविधा न मिळाल्याने त्रास झाला. याला पियुष गोयल जबाबदार होते. गोयल यांना महाराष्ट्राचे प्रेम नाही ते गुजरातचे गोडवे गातात. आपल्या राज्यातले उद्योग गुजरातला गेले. त्याचे उत्तर गोयल देत नाहीत. टेस्ला महाराष्ट्रात येणार की गुजरातला जाणार याचे उत्तर ते देत नाहीत. कारण गोयलांना गुजरातचा विकास करायचा आहे. मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा नाही. असे असताना मुंबईचे प्रतिनिधीत्व ते कसे करणार?” अशा शब्दात सावंत यांनी पियुष गोयल यांच्यावर टीका केली.

“सध्या भाजपाच्या विरोधात जनमत आहे. विदर्भातून काँग्रेसची लाट सुरु झाली. कारण विदर्भात काँग्रेसला जोरदार मतदान झालं आहे. ही लाट राज्यभर असणार आहे. त्यामुळे देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल,” असा विश्वास देखील सावंत यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

नाशिककर आणि दिंडोरीकर Mahayuti च्या कामाची पोचपावती देतील, CM Eknath Shinde यांचा विश्वास

PM Modi देशासमोरच संकट नसून विरोधकांसमोरच संकट, Devendra Fadnavis यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version