४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिरांचे लोकार्पण

४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिरांचे लोकार्पण

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण सोहळा झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. वंचितांच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर परिश्रम केले. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यादृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल. जागतिक लोकशाही दिवस सर्वत्र साजरा होत असताना आपल्याला अभिमान आहे की भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून जो विविधतेतही एकता जपून आहे. याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. भारतीय हीच आपली पहिली ओळख असून राज्यघटनेप्रती आपण सदैव आदर बाळगणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्व नव्या पिढीला समजावे यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत असेही  धनखड यांनी सांगितले. राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण हा उपक्रम स्तुत्य असल्याचे धनखड यांनी सांगितले.

यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदश्य संवादप्रणाली व्दारे उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, विकास आयुक्त प्रदिपकुमार डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांनी संविधान संग्रहालयाचीही पाहणी केली.

Exit mobile version