Mumbai Rain Incident: मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू, जबाबदार कोण?

Mumbai Rain Incident: मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू, जबाबदार कोण?

25 सप्टेंबर रोजी मुंबईत (Mumbai) पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे विविध ठिकाणी पाणी साचले होते. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यांमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राउंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या या खड्ड्यात महिला पडून 100 मीटर वाहून गेली. अग्निशमन दलाने एक ते दीड तास सर्च ऑपरेशन करून महिलेला नाल्यातून बाहेर काढले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

मुंबईमधील अंधेरी पूर्व (Andheri East) येथे एमआयडीसी (MIDC) परिसरात कंपनीच्या समोर एक महिला रात्री साडेनऊच्या दरम्यान रस्ता क्रॉस करत होती. मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता. त्या खड्ड्यावर झाकण ठेवले गेले नव्हते, त्याच खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे (BMC) कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. या महिलेला कूपर रुग्णालयात दाखल केले असता तिचा  मृत्यू झाला. सिप्झ कंपनीसमोर रस्त्यावर मेट्रो तीन लाईनसाठी काम करण्यात आले होते. काम केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडे हँड ओव्हर करायचा होता मात्र, मुंबई महानगरपालिका पूर्व विभागाने मेट्रो तीन लाईनला पत्र लिहून संपूर्ण रस्त्याचा पहिल्यासारखा काम करून मग हँड ओव्हर करा, असं पत्र दिलं होतं. सध्या ड्रेनेज लाईनवर मुंबई पोलिसांनी झाकण ठेवून बंद केले आहे. विमला अनिल गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चूक नेमकी कोणाची? कोणाच्या चुकीमुळे महिलेचा बळी गेला या संदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे.

कोणत्या भागात आहेत अलर्ट?

रेड अलर्ट: पुणे, रत्नागिरी, रायगड

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड

यलो अलर्ट: जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव

Exit mobile version