Social Media कितीही प्रबळ असले तरीही विश्वासार्हता टिकवण्याचे काम वृत्तपत्र लेखकांकडूनच, Bhushan Gagrani यांची ग्वाही

Social Media कितीही प्रबळ असले तरीही विश्वासार्हता टिकवण्याचे काम वृत्तपत्र लेखकांकडूनच, Bhushan Gagrani यांची ग्वाही

दैनिक ‘नवशक्ति- फ्री प्रेस जर्नल’ वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या ‘जनमनाचा कानोसा’ संमेलनाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी वृत्तपत्र लेखकांची चळवळ जोमाने सुरु ठेवावी, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इतिहासात सीमा लढा असो, की स्थानिक चळवळी, त्यात वृत्तपत्र लेखकांनी जनमत घडविण्याचे अनमोल कार्य केले आहे. आज समाज माध्यमे कितीही प्रबळ झाली असली, तरी विश्वासार्हता टिकविण्याचे काम हे वृत्तपत्र लेखकांकडूनच होत आहे. त्यामुळे जनतेचे प्रांजळ विचार मनामनात पोहोचवणारी वृत्तपत्र लेखकांची चळवळ यापुढे अशीच जोमाने सुरू ठेवण्याची अपेक्षा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, हा समारंभ अत्यंत कौटुंबिक वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे औपचारिक भाषण न करता मी मनोगत मांडणार आहे. वृत्तपत्र लेखकांच्या या चळवळीचा पाया ‘नवशक्ति’ आणि ‘फ्री प्रेस जर्नल’ तसेच त्यांच्या मालक- व्यवस्थापनाने घातला. मी आता पालिका आयुक्त पदावर असलो तरी राज्याच्या माहिती महासंचालनालयातही होतो. त्यामुळे पत्रकारितेचे क्षेत्र मी जवळून अनुभवले आहे. त्या काळात समाज माध्यमांना नुकतीच पालवी फुटू लागली होती. ती पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. अशा वेळी सर्वसामान्य लोकांसाठी वृत्तपत्रांत पत्रलेखन हेच एक अभिव्यक्तीचे मुख्य साधन होते. त्या काळात बहुतांश वर्तमानपत्रांचे याबाबत उत्तम धोरण होते. चांगल्या लेखकांच्या पत्रांना वर्तमानपत्रात योग्य स्थान दिले जात होते. सरकार आणि प्रशासनालाही जनमताचा आरसा म्हणून अशा पत्रांचा उपयोग होत असे. सध्या जिल्हा परिषदा असोत. की नगरपालिका, महापालिका असोत, तेथे महापौर, लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. आमच्याकडे लोकांकडून येणारा फीडबॅक पूर्णपणे बंद झाला आहे. हा अपवादात्मक प्रसंग आहे. तसे पाहता लोकप्रतिनिधींकडून मिळणारा फीडबॅक हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असतो. पण वृत्तपत्र लेखकांची पत्रे ही प्रांजळ असतात, असे परखड निरीक्षणही गगराणी यांनी नोंदवले.

गगराणी म्हणाले की, जागतिक स्तरावरचे इकॉनॉमिस्ट हे वर्तमानपत्र गेली दीडशे वर्षे प्रत्येक अंकात एक पान वाचकांच्या पत्रांसाठी देते. त्यात विविध विषयांवर गंभीर चर्चा करणारी वाचकांची पत्रे असतात आणि शेवटी एक पत्र मनोरंजनात्मक असते. त्यातून वृत्तपत्र लेखकांची सर्जनशीलता दिसून येते. ‘नवशक्ति’, ‘फ्री प्रेस जर्नल’ यांनी जोपासलेली ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आहे. वाचकांच्या पत्रांमधून खरेतर लोकांच्या मनात काय चालले आहे, याची नाडीपरीक्षा होते. लोकांचे विचार पोहोचवणारी ही चळवळ अशीच चालू राहो यासाठी माझ्या शुभेच्छा आणि माझे ते तुम्हाला आवाहन आहे असेही समजा, असे मनोगत भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.

या समारंभात ज्येष्ठ पत्रलेखक विजय ना. कदम, मधुकर कुबल, सुनील शिंदे, परशुराम पाटील, सुनील कुवरे, कृष्णा ब्रीद, भाऊ सावंत आदींचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमृतपर्व सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, मनोहर साळवी, प्रकाश नागणे, प्रशांत घाडीगावकर, दत्ताराम घुगे, नंदकुमार रोपळेकर, चंद्रकांत पाटणकर, राजन देसाई, आत्माराम गायकवाड, अरुण खटावकर, श्रीनिवास डोंगरे, नवनाथ दांडेकर, अनंत मोरे, दिगंबर चव्हाण आदींना सन्मानपत्र देण्यात आले.

हे ही वाचा:

Exit mobile version