spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सागरी किनारी मार्गाची मुदत चुकल्याने कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय ठरणाऱ्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची सुरुवात ऑक्टोबर, २०१८मध्ये झाली.

मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय ठरणाऱ्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची सुरुवात ऑक्टोबर, २०१८मध्ये झाली. आतापर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी बांधकाम क्षेत्रातील तीन बड्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. मुदतीत किती काम पूर्ण झाले, कामात विलंब झाला असल्यास काय दंडात्मक कारवाई करण्यात आली, याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. परंतु मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारी मार्गाची बांधकाम पूर्णत्वाची मुदत चुकल्याने तीन कंत्राटदारांना मिळून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सागरी किनारी मार्गाची बांधकाम पूर्णत्वाची मुदत चुकल्याने तीन कंत्राटदारांना मिळून तब्बल ३१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीत आतापर्यंत एक वर्षाचा विलंब झाला असून मुदतीत काम पूर्ण होत नसल्याने नोव्हेंबर २०२३पर्यंत नवीन मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती समोर येत आहे. खर्चात झालेली वाढ लक्षात घेता आकारलेला दंड फारच कमी आहे, असे गलगली यांचे म्हणणे आहे. प्रकल्पाची कामे मिळविण्यासाठी कंत्राटदार प्रयत्नशील असतात मात्र एकदा काम मिळाल्यानंतर वेळेत प्रकल्प पूर्ण होत नाहीत. त्यामुळे प्रकल्प खर्चात वाढ होते. सर्वसामान्य मुंबईकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांतून वाढीव खर्च भागविला जात असल्याची तक्रार गलगली यांनी केली आहे.

या प्रकल्पाचे काम तीन भागांमध्ये विभागले आहे.अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम मे. लार्सन अँड टुब्रो यांस दिले असून मूळ खर्चात ९९.७९ कोटींची वाढ झालेली आहे. मूळ कंत्राट खर्च ३,५०५ कोटी रुपये अपेक्षित होता. २० जून, २०२३पर्यंत २,२८६ कोटी कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. आतापर्यंत या कामात ८.५७ कोटींचा दंड आकारला आहे. तर काम पूर्ण करण्याची तारीख १२ ऑक्टोबर, २०२२ होती. नवीन मुदतवाढीनंतर १० सप्टेंबर, २०२३ रोजी काम पूर्ण होईल.यानंतर दुसऱ्या भागांतर्गत बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम मे. एचसीसी- एचडीसी कंपनीला दिले असून मूळ खर्चात ६२.२५ कोटींची वाढ झालेली आहे. मूळ खर्च २१२५ कोटी अपेक्षित होता. २० जून २०२३ पर्यंत ११९३ कोटी कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. या कामात १५.३७ कोटींचा दंड आकारला आहे. काम पूर्ण करण्याची तारीख १५ ऑक्टोबर २०२२ होती. मुदत वाढ दिली असून ७ ऑक्टोबर २०२३ रोजी काम पूर्ण होईल.आणि शेवटच्या भागांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचे काम मे. लार्सन अँड टुब्रोला दिले असून मूळ खर्चात ६३.८३ कोटींची वाढ झालेली आहे. मूळ खर्च २७९८ कोटी अपेक्षित होता. २० जून २०२३ पर्यंत २१६० कोटी कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. आतापर्यंत या कामात ७.२५ कोटींचा दंड आकारला आहे. काम पूर्ण करण्याची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. मुदतवाढीनंतर २६ नोव्हेंबर २०२३ रोजी काम पूर्ण होईल.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश

शरद पवारांनी दिले फडणवीसांना खोचक शब्दात उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss