लोकांना घरापासून वंचित ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी केले: Shrikant Shinde

लोकांना घरापासून वंचित ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी केले: Shrikant Shinde

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यातच आज (रविवार, २२ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दक्षिण मुंबईतील भायखळा आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून यानुसार आपण संघटना अधिक बळकट करून आपली कामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा,” असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका करत, “मुंबईत लोकांना घरापासून वंचित ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी केले,” असे विधान त्यांनी केले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “शिवडी, भायखळा, वरळी, विक्रोळी, भांडुप या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये बैठका होणार आहेत. त्यापैकी भायखळा आणि शिवडी विधानसभा मतदारसंघात बैठका झाल्या आहेत. या बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलून लोकांच्या समस्या जाणून घेण्याच्या प्रयत्न करत आहे. असे बरेच विषय कशा पद्धतीने मार्गी लागतील याकरिता या जनसंवाद यात्रेतून सुरुवात झाली आहे. मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहे. मुंबई आणि शिवसेनेच एक वेगळं नातं आहे. यामुळे या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करायला हवे,” असे ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “रमाबाई नगर जो एसआरएचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प देखील सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला त्याला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे त्याला यश देखील मिळालं आहे आज रमाबाई नगर मधील हजारो कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. म्हाडाच्या इमारतीच्या दुरुस्तीचा विषय, क्लस्टरचा विषय आहे, क्लस्टर योजना ही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच संघटनात्मक ताकद कशी आहे, कशाप्रकारे काम सुरु आहे या सगळ्याचा आढावा घेण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“जसे लोकसभेला खऱ्या शिवसेनेच्या मागे लोकं उभी राहिली, त्याच पद्धतीने आता देखील होईल. आज मुंबईत घरांचा मोठा प्रश्न आहे, आणि लोकांना घरापासून वंचित ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी केले. लोकसभेवेळी काय गैरसमज पसरवला गेला हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील,” असे ते म्हणाले. या प्रसंगी खासदार मिलिंद देवरा, आमदार यामिनी जाधव, शिवसेना सचिव किरण पावसकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version