आजपासून विधिमंडळाचे Monsoon Session सुरु, राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर

आजपासून विधिमंडळाचे Monsoon Session सुरु, राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) मुंबई येथे गुरुवार, २७ जून म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या चर्चेचा विषय झाले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. याबाबत विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली होती.

पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे बैठकीत ठरविण्यात आले आहे. २०२३ मध्ये पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) १७ जुलैपासून सुरु झाले होते. ते १४ ऑगस्टपर्यंत सुरु राहिले होते. हे अधिवेशन मुंबईत (Mumbai News) पार पडले असून १५ दिवस सुरू राहिले होते.

विधानभवन येथे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली होती. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जूनपासून सकाळी ११ वाजता सुरू होत आहे. सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने विधिमंडळ सदस्य आणि पत्रकारांना उपलब्ध व्हावा, साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी, कर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून देण्यात आल्या होत्या.  विद्यमान १४ व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने नियोजन करावे. शनिवार, २९ जून, २०२४ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावे, सुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीस, अन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी, महिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्ष, स्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी स्वच्छता होईल, अशी दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

Exit mobile version