रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा, तर दुसरीकडे नागरिकांचे खड्ड्यांना पुष्प अर्पण करुन आंदोलन

रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा, तर दुसरीकडे नागरिकांचे खड्ड्यांना पुष्प अर्पण करुन आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे – नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे- नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री रस्त्यावर उतरवून कामाचा आढावा घेत असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांना रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आंदोलन करावे लागत आहार.

चांदवड शहरात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे शहरातील अनेक भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने आज (९ ऑगस्ट, शुक्रवार) नागरिकांनी खड्ड्यांना पुष्प अर्पण करुन आंदोलन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “चांदवड शहरातील बाजारपेठ, बाजारवेश व मेन रोड या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. सगळीकडे रस्त्यांमध्ये मोठ – मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्डे मोठ – मोठे असल्याने या खड्डयांत पावसाचे पाणी साचते. या रस्त्यांमधुन लोंखाडी गज देखील बाहेर निघालेले आहेत. ही बाब शासकिय अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असून‌ सुद्धा ते याकडे जाणून – बुजून दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रामध्ये चांदवड हे “खड्डेमय गाव” म्हणून ओळखले जात आहे. लोकांना चालायला रस्ते नाहीत. वयोवृध्द लोकांना देखील या रस्त्यावरून चालता येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहने चालवितांना व पायी चालताना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यांवर अनेक छोटे – मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहेत. या अपघातांमध्ये अनेक लोकांचे हात – पाय फॅक्चर झालेले आहेत. काही लोकांचे पाठीचे मणके देखील यामुळे निकामी झालेले आहेत. दुचाकीस्वारांना या रस्त्यांवरुन दुचाकी सुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही. रस्त्यांमध्ये गटारीचे ढापे काढून ठेवलेले आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.”

ते पुढे म्हणाले, “शहरातील सर्वच शैक्षणिक संस्था, बाजार तसेच शासकिय व निमशासकीय संस्थांना जोडणारा हा रहदारीचा प्रमुख मार्ग असल्याने येथे लोकांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चांदवड शहरातील श्रीराम रोड, शिवाजी चौक, डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर शाळा रोड व सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत व शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत. परंतु या रस्त्यावर पडलेले खड्डे बघता ‘या रस्त्यावरून चालायचे कसे?’, हा प्रश्न शहरातील लोकांना पडलेला आहे. लोकांना मागील पंधरा ते वीस वर्षांपासून चालायला चांगले रस्ते नसल्याने शहरातील नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत. या आधीच्या मुख्याधिकाऱ्यांनी संपूर्ण निधी लाटून खाल्ल्याने व शहरातल्या लोकांना चालायला चांगले रस्ते नसल्याने लोकांमध्ये संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या आधीच्या मुख्याधिकाऱ्याने जनतेच्या पैश्यांच्या निधीचा गैरवापर केलेला आहे. शहरात मागील २० – २५ वर्षांत कोणतेच विकासकामे करण्यात आलेले नाही. शासकिय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच तसेच आतापर्यंत अनेक नागरिकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिके यांना निवेदन दिली असून तरी याकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे.” त्यामुळे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेभाऊ अहिरे यांच्या वतीने खड्ड्यांना पुष्पहार घालून व खड्ड्यांवर पुष्प वाहत फुलांनी खड्डे सजविण्यात आले व रस्त्यावरील खड्ड्यांवर बसून ठिया आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचा :

Waqf Board च्या जमिनी Congress ने लाटल्या, Devendra Fadnavis यांचे गंभीर आरोप

Modi Government चा डोळा Waqf Board च्या जमिनींवर, Jitendra Awhad यांची जोरदार टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version