Pune: ८० टक्के पुणेकरांना आहेत मानसिक समस्या; संशोधनात आले समोर

18-24, 25 ते 40 आणि 60 वर्षांवरच्या अशा वयोगटांमध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं

Pune: ८० टक्के पुणेकरांना आहेत मानसिक समस्या; संशोधनात आले समोर

Mental Health

मुंबई: सध्याचं हे खूप धावपळीचं आणि धकाधकीचं होत चाललं आहे. कामाच्या आणि इतर समस्यांच्या तणावामुळे माणसांना आता उसंत घ्यायला वेळ राहील नाहीये. ताणतणाव कसा कमी करावा यासंबंधी अनेक गोष्टी आपल्या पाहण्यात आणि ऐकण्यात येत असतात. अशीच पुणेकरांच्या मानसिक आरोग्याबद्दल एक आश्चर्यजनक माहिती एम-पॉवर या मानसिक आरोग्य सेवा पुरवठादार कंपनीने सादर केलेल्या सर्वेक्षणातून समोर येत आहे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

एम-पॉवर हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे चालवला जाणारा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या नागरिकांचं मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आलं. त्याचा मेंटल हेल्थ स्कोअर अर्थात मानसिक आरोग्य गुण नुकतेच सादर करण्यात आले. त्यानुसार, पुणे-पिंपरी-चिंचवडमधल्या पाचपैकी चार म्हणजेच सुमारे 80 टक्के नागरिकांना कोणती ना कोणती मानसिक आरोग्यविषयक समस्या जाणवत आहे. ही आकडेवारी आता विस्ताराने पाहू.

18-24, 25 ते 40 आणि 60 वर्षांवरच्या अशा वयोगटांमध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 85 टक्के महिला आणि 70 टक्के पुरुषांना मानसिक आरोग्याचा ताण सहन करावा लागला आहे. महिलांमध्ये याचं प्रमुख कारण डिप्रेशन हे आहे, तर पुरुषांमध्ये चिंता अर्थात Anxiety आणि पॅनिक डिसॉर्डर ही प्रमुख कारणं आहेत.अनेकांना पॅनिक डिसॉर्डर, रिलेशनशिपमध्ये अस्थिरता, धोका-विश्वासघात, छळ, ओपन रिलेशनशिप, घोस्टिंग अशा समस्याही भेडसावत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

‘एम-पॉवर’च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीरजा बिर्ला यांनी सांगितलं, ‘आम्ही एम-पॉवरच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल देशात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करतो. गरजू व्यक्तींना मदत मागण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देतो. एखाद्या शहराशी निगडित असलेला मेंटल हेल्थ स्कोअर जाहीर करून आम्ही हे दर्शवू इच्छित आहोत, की मानसिक आरोग्य हा काही आता लपवण्याचा विषय राहिलेला नाही. मानसिक आरोग्याची समस्या कोणत्याही वयोगटातल्या, कोणत्याही ठिकाणच्या आणि कोणत्याही भवतालातल्या व्यक्तींना जाणवू शकते. कोरोना महामारीच्या काळात एकटेपणा, अस्थिरता, चिंता सर्वांनी अनुभवली. त्यामुळे मानसिक समस्या वाढीला लागल्या. मानसिक समस्या आहे हे ओळखून ते मान्य करणं आणि त्यावर उपायासाठी प्रोफेशनल मदत घेणं या गोष्टींची गरज आहे. कारण मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे जीवनातला आनंद तर जातोच; पण त्याचा अप्रत्यक्ष परिणाम देशाची उत्पादकता आणि विकासावरही होतो. त्यामुळे या समस्या ओळखून त्यावर उपचार घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे.’

Exit mobile version