पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराज यांचे नाव देणे, ही सर्वांचीच भावना- Murlidhar Mohol

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराज यांचे नाव देणे, ही सर्वांचीच भावना- Murlidhar Mohol

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल, या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना भेटून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ (Murlidhar Mohol) यांनी चर्चा केली होती. त्यांनी दिलेल्या प्रस्तावानंतर काहीच दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला असून त्याबद्दल तिन्ही नेतृत्वाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी आभार मानले आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचं आजोळ होते. इतकेच नाही, तर तुकाराम महाराजांचे बालपण लोहगावमध्ये गेल्याने लोहगाव आणि तुकोबाराय यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता. शिवाय, वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार, प्रसारात तुकोबारायांनी मोठं योगदान देत समाजाला नवा विचार दिला, जो आजही काल सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबारायांचं नाव पुण्याच्या आंतराष्ट्रीय विमामतळाला देणे, हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे. आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. मला विश्वास आहे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Navratri Fashion : यावर्षीच्या नवरात्रौत्सवात ‘या’ अभिनेत्रींच्या फॅशन टिप्स वापरून पहा; दिसाल आणखी खास

नवरात्रौत्सवात उपवास करताय ? मग कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घ्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version