Pune Zika Virus : पुणे शहरात आतापर्यंत झिकाचे ६६ रुग्ण, अनेकांना झिकाचा संसर्ग

Pune Zika Virus : पुणे शहरात आतापर्यंत झिकाचे ६६ रुग्ण, अनेकांना झिकाचा संसर्ग

Pune Zika Virus Cases: पुण्यात झिकाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक ६६ रुग्ण आढळले आहेत. तसेच, राज्यात आतापर्यंत एकूण ८० रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. झिका (Zika) हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू (Zika Virus) हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेतंर्गत रूग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येत आहे. गर्भवती महिलांचे रक्तजल नमुन्यांचे संकलन व तपासणी, सर्व रूग्णांना लक्षणांवर आधारीत उपचार, गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी किटक शास्त्रीय उपाय योजना करण्यात येत आहे.

झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काय करायचे? 

गावातील सर्व पाणी साठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, जे घरातील पाणीसाठे रिकामे करता येत नाही, त्यामध्ये गप्पीमासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा. निरूपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये रहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

झिका विषाणूची लक्षणे:

सामान्यत: झिका (Zika) विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के लोकांमध्ये कोणताही संसर्ग दिसून येत नाही, परंतु जर एखाद्याला ताप, पुरळ, सांधे व स्नायू दुखणे, डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे संक्रमित डास चावल्यानंतर एक आठवड्यानंतर दिसतात आणि सुमारे एक आठवडा टिकू शकतात.

Exit mobile version