Rain Alert : राज्यभर पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट…

Rain Alert : राज्यभर पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट…

राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुढील २ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. मुंबई अन् पुण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाच तासांतच २०० मिमी पाऊस झाला आहे. पुण्यातही १२५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अजूनही मुंबईत कमी वेळेत अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र बुधवारपेक्षा त्याची तीव्रता कमी असणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे, मुंबई भागासह मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला. यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई शहरासह उपनगरात तीव्र ते अतितीव्र पावसाचा अंदाज वर्तवला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेडमध्ये मध्यम सरींचा अंदाज असून लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती विदर्भ आणि लगतच्या भागात सक्रीय आहेत. त्यामुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण भागात पावसाचा जोर राहणार आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे.

मागील दोन दिवसात झालेल्या पावसानं मराठवाड्यातील धरणपातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मराठवाड्यातील बहुतांश धरणे आता भरण्याच्या मार्गावर असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. उद्यापासून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

Mumbai Rain Incident: मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू, जबाबदार कोण?
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version