Rain Updates : परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु; मराठवाड्यात पिकांचं नुकसान

मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्राची रजा घेतल्यानंतर मधले काही दिवस पावसाने आपले तोंड लवपले होते. पण आता परतीच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार बॅटिंग केली असून यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.

Rain Updates : परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु; मराठवाड्यात पिकांचं नुकसान

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत-पिकांचे नुकसान

मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्राची रजा घेतल्यानंतर मधले काही दिवस पावसाने आपले तोंड लवपले होते. पण आता परतीच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार बॅटिंग केली असून यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर येणाऱ्या तीन दिवसांत कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात काल (२८ सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे लातूर (Latur), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात नुकसान झाले आहे. कमी कालावधीत झालेल्या या तुफान पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतरही पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी सोयाबीन लागवडीपासूनच सतत होणारा पाऊस, शंख गोगलगाय, रोगराई असे संकट सुरु होते. यातून जी पिके वाचली त्यांना या पावसाचा फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि आताच शेतकऱ्याच्या हातात येणाऱ्या झेंडूच्या फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झेंडूच्या फुलांमध्ये पाणी साचले असून संपूर्ण झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगामी दसरा सणाला ही सर्व झेंडूची फुलं शेतकऱ्याला मोबदला मिळवून देणार होती.

जोरदार वारे आणि विजेच्या कटकडाटासह झालेल्या पावसाने जीवितहानी देखील झाली आहे. लातूर जिल्ह्यात एक महिला आणि दोन जनावरे वीज पडून प्राणास मुकले आहेत. हिंगोलीतील फुल शेती पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. तसेच इतर पिकाचेही नुकसान झाले आहे. परभणीत तीन दिवसांपासून पावसाने पाठ सोडली नसल्यामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसापासून सतत पावसामुळे अनेक शेत शिवारात पाणी जमा झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेले आहे. पावसाने आता उसंत घेतली नाहीतर तर नुकसान न भरुन येण्यासारखी स्थिती तयार होईल

तर दुसरीकडे जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला होता. वाई बोल्डा रोडवरील ओढ्याला पूर आल्याने अनेक मजूर अडकून पडले होते. अखेर या मजुरांना जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने या बाहेर काढण्यात आले. तसेच प्रवास करणाऱ्या अनेक गाड्या या पुरामुळे थांबलेल्या होत्या.

यंदा मान्सूनच्या पावसाने अनेक ठिकाणचा शेतकरी सुखावला असून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिवृष्टीमुळे पाणी आले आहे. त्याचबरोबर आता रब्बीच्या पिकासाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा असल्याने येत्या तीन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मान्सूनने राज्याच्या निरोप घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गुरूवारी पाऊस होईल. त्याचबरोबर मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात शुक्रवारी तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शनिवारी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सर्वसामान्यांचे बजेट गडबडलं; कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला 

टेंभी नाका देवीच्या आरतीचा मान कोणाला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version