१ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे महागणार

१ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे महागणार

अनेक दिवसांपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांची मागणी होती. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रात प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार, ऑटोरिक्षाच्या दरात किमान २ रुपयांची वाढ करण्यात आली असून काळी पिवळी टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर कुल कॅब एसी टॅक्सीच्या किमान दरात ७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांना रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढी संदर्भात महत्वाचे वृत्त आले आहे. त्यानुसार ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ऑटोरिक्षाचा दर पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये इतका होता, त्यात वाढ होऊन तो आता २३ रुपये इतका झाला आहे. तर, काळी पिवळी टॅक्सीचा पहिल्या टप्प्यातील किमान दर २५ रुपये होता. त्यात वाढ होऊन तो आता २८ रुपये इतका झाला आहे. तसेच, कुल कॅब एसी टॅक्सीसाठी किमान १.५ किमीसाठी पहिल्या टप्प्याकरिता ३३ रुपये इतका दर होता. त्यात वाढ होऊन तो आता ४० रुपये इतका होईल.

खटूआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधनाचे दर इतर संबंधित बाबी विचारात घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक/मालक व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने २६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारित कलेला आहे. याच ठरावानुसार ही भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू होईल.

हे ही वाचा:

या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला? केंद्र सरकारने केली घोषणा

घ्या जाणून वेळापत्रक ; नागपूरवरुन सुटणार ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version