spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवकालीन वाघनखांच्या दिमाखदार सोहळ्यासाठी Satara नगरी सज्ज ; आज पडणार हा भव्य सोहळा पार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त गेल्या वर्षभर उत्सुकता लागून (Chhatrapati Shivaji Maharaj) राहिलेली वाघनखे मोठ्या कडक बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आली. ही वाघनखे आणताना पुरेपूर गुप्तता पाळण्यात आली होती. शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखे ठेवण्यात आली आहेत. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे शिवभक्तांना दर्शनासाठी आज दिमाखदार सोहळ्यानंतर उपलब्ध होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज आहे.

शिवजी महाराजांच्या वाघनखांचे स्वागताचे नियोजन करण्याची प्रशासनाची बैठक पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार  छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागप्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी ‍जितेंद्र डुडी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली व सूचना केल्या. यावेळी अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धकाळात वापरलेली वाघनखे ही साताऱ्यात अत्यंत गुप्तता पाळत पोलीस बंदोबस्तात १७ जुलै रोजी आणण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्हास्तरावर महानाट्याचे आयोजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी निगडित घटना, स्थळे व महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित १३ विशेष टपाल तिकिटांचे व टपाल आवरणाचे अनावरण करण्यात येणार आहे. पुढील सात महिने ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना व विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रप्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. शिवशस्त्र प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र दालन, वस्त्र दालन, नाण्यांचे दालन व इतर दुर्मीळ वस्तू पाहावयास मिळतील. तलवारी, बंदुकी, भाले, पट्टे, कुऱ्हाडी, कट्यारी, बाण, गदा अशी वेगवेगळी शस्त्रे पाहावयास मिळतील. या स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहरभर स्वागत कमानी उभारून बॅनर्स, पोस्टर्स, वस्तूसंग्रहालयाभोवतालची अतिक्रमणे काढून स्वच्छता केली आहे. वस्तूसंग्रहालयाची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम (Victoria Albert Museum) येथून वाघनखे आणण्यात आली आहेत. ही शिवकालीन वाघनखे वस्तूसंग्रहालयातील दालन क्रमांक तीनमध्ये ठेवण्यात आली आहेत. वाघनखाच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सॉर तसेच संरक्षण यंत्रणेने बंदोबस्त चोख ठेवला आहे. दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इतर प्रेक्षकांना प्रति १० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाघनखे पाहण्यास दालन खुले राहणार आहे.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

विवाहित दांपत्यांसाठी आली नवी खुशखबर ; केला मोठा निर्णय जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss