spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Eknath Shinde यांच्या हस्ते Thane शहरात विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज ठाणे महापालिका क्षेत्रातील (Thane), ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न झाले. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडवली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभात बोलताना सांगितले कि, “आजचा दिवस इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे.”

“नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. एका बाजूला डोंगर, मध्ये खाडी, त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळीकडे उपलब्ध होत नाही. ते ठाण्यात उपलब्ध आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे. त्याचे उद्घाटन आज संपन्न झाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजनही आज कऱण्यात आले. 12 समाजाचे मिळून समाज भवनाचेही भूमीपूजन केले. ठाणे खरेच खूप बदलते आहे. ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे,” असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

“मुंबई-ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे. पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला तीन हजार फूटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर दोन समाजांसाठी जागा असेल. त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे, ही सर्व समाजांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्व समाजांशी संपर्क असायचा. तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर अतिशय प्रेम होते. त्यामुळे ठाण्यात असे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे,” असेही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्याचबरोबर “मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे” या अभियानात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले ‘या’ प्रकल्पांचे लोकार्पण

  1. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुख (टप्पा २) – केंद्र आणि राज्य सरकार, ठाणे महानगरपालिका, ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुख टप्पा २ तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंतर्गत येथे सुमारे 800 मीटरची लांबी असलेल्या या चौपाटीवर जेट्टी, गणेश विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट, खाडीलगत पादचाऱ्यांसाठी पदपथ, रस्त्यालगत पदपथ, मियावाकी उद्यान, आसन व्यवस्था, ॲम्फी थिएटर, वाहन पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृहे, विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
  2. डॉ. सिंधूताई सपकाळ तिरंदाजी केंद्र – ठाणे महापालिकेतर्फे वर्तकनगर खेळाचे मैदान या आरक्षित भूखंडावर बांधकाम टीडीआरमार्फत डॉ. सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिरंदाजीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च आला आहे.

‘या’ प्रकल्पांचे झाले भूमिपूजन

  1. ‘महापालिकाक्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजना – याअंतर्गत, नागला बंदर येथील खाडीकिनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  2. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समता नगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास होणार आहे. तेथील ३५३ झोपडपट्टीधारकांचे सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. सोबत नाना-नानी पार्क, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, पार्किंगची व्यवस्था आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या खर्च सुमारे १५० कोटींच्या घरात आहे.
  3. वसंतविहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  4. शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  5. कासारवडवली येथे सुविधा भूखंडांवर विविध समाजांच्या भवनांची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss