जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणातील खळबळजनक ऑडिओ क्लिप

Jitendra Awhad Tweet About Akshay Shinde Encounter : बदलापूर या ठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली. यानंतर २० ऑगस्टला बदलापूरमध्ये लोकांनी उत्स्फूर्त बंदही पुकारला तसंच रेल रोकोही केला. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली. त्याला फाशी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीनेही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणासाठी तळोजा तुरुंगातून अक्षय शिंदेला ठाण्याला नेत असताना चकमकीत त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबर रोजी एन्काऊंटर करण्यात आला. पण हा एन्काऊंटर कुठे करण्यात आला? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाला पाच दिवस उलटल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यक्षदर्शींची एक क्लिप पोस्ट केली आहे.त्यात हा एन्काऊंटर होत असताना तिथे उपस्थित असणारा प्रत्यक्षदर्शी आणि एका पत्रकाराचा ऑडिओ क्लिप शेअर केला आहे. त्यात अक्षय शिंदेचा एनकाऊंटर हा मुंब्रा बायपास रोडवरील हजरत सय्यद फकीर शहा बाबा दरगाहच्या पुढे काही अंतरावर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिली आहे, जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या क्लिपमधलं संभाषण दोन हिंदी भाषिक व्यक्तींमधलं आहे. हे दोघंही मुंब्रा भागातले रहिवासी आहेत असं संभाषणावरुन लक्षात येतं आहे.

संभाषण काय आहे?

कथित प्रत्यक्षदर्शी : अस-सलाम-अलैकुम

दुसरी व्यक्ती : वा-अलैकुम-सलाम

कथित प्रत्यक्षदर्शी : भाई मी तुम्हाला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. पण नंतर मी घाबरलो आणि ते डिलीट केलं.

दुसरी व्यक्ती : का?

कथित प्रत्यक्षदर्शी : ते काय झालं ना… अक्षय शिंदेचा जो मर्डर झाला. त्याच्या मागे माझीच गाडी होती. मी काही करू शकलो नाही. म्हटलं तुम्हाला सांगावं. पण मग विचार केला की काही चुकीचा मेसेज नको जायला. माझ्या मागे गोष्टी लागायला नको.

दुसरी व्यक्ती : व्हीडिओ होता का तुमच्याकडे?

कथित प्रत्यक्षदर्शी : नाही व्हीडिओ नाहीये. पण मी आणि मेव्हणा एका रॅलीला जात होतो. मुंब्रा बायपासवरून जात होतो. तेव्हा एक व्हॅन पाठीमागून आली. त्या व्हॅनला पडदे लावले होते. गाडीतून ठक करून आवाज आला. आम्हाला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. मग पुन्हा आवाज आला. मग मी घाबरलो. म्हटलं काही तरी इश्यू असेल. तेव्हा पोलिसांनी गाडी थांबवली. दोन पोलीसवाले बाहेर आले. मग पुन्हा त्यांनी व्हॅन बंद केली. मग तिसरा आवाज आला. तेव्हा आम्ही घाबरलो. त्यांना ओव्हरटॅक केलं आणि निघून गेलो. ते कळव्याकडे गेले आणि आम्ही जंक्शनकडे गेलो. आता मी तुमच्याशी बोलतोय. पुढे काही अडचणी नको यायला.

दुसरी व्यक्ती : नाही काही अडचण नाही येणार… का अडचण येणार?

कथित प्रत्यक्षदर्शी : मला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. पण तिसऱ्यांदा आवाज आला. गाडीला पण पडदे लावले होते. माझा मेव्हणा पण घाबरला. म्हणाला चला इथून… आणि आम्ही तिथून निघून गेलो.

असं संभाषण जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलं आहे. तसंच हे संभाषण कथित प्रत्यक्षदर्शीचं आहे असाही दावा आव्हाड यांनी केला आहे. आता याबाबत पोलीस किंवा गृहखात्याकडून काही उत्तर दिलं जातं का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Exit mobile version