मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचा १८ एप्रिल रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी, १८ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचा १८ एप्रिल रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी, १८ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती प्रकाशन सोहळ्याच्या आयोजन समितीचे निमंत्रक उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे दिली.

‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे, असे प्रतिपादन प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक व शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनातील संघर्षशील प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या चरित्रग्रंथाचे लेखन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, समकालीन मंडळी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केला असल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईत आले, तिथून ते ठाणे येथे स्थायिक झाले. हा सारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र कष्टाच्या, निष्ठेच्या आणि सचोटीच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विलक्षण झेप घेतली. या त्यांच्या वाटचालीतील विविध प्रसंग, घटना-घडामोडी यांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि नेतृत्वाची घडण कशी झाली, हे महाराष्ट्रीय जनांपुढे मांडण्याच्या प्रांजळ हेतूने ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ हे चरित्र शब्दबद्ध केल्याची भावना प्रा. डॉ. ढवळ यांनी यावेळी व्यक्त केली. या ग्रंथाला ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभली असून पुस्तकाची पाठराखण स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभसंदेशाने केली आहे. पुस्तकाचे सहलेखन डॉ. अरुंधती भालेराव यांनी, तर संकलन राजन बने व सान्वी ओक यांनी केले आहे. तसेच या चरित्रग्रंथाच्या विक्रीतून उभा राहणारा निधी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या जीवा महाला यांच्या सोळाव्या वंशजांच्या मुलीच्या विवाहासाठी देण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी यावेळी सांगितले. तर या चरित्रग्रंथाची उत्तम निर्मिती करण्यात आली असून वाचकांना सवलतीच्या दरात तो उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ग्रंथाली प्रकाशनाच्या धनश्री धारप यांनी यावेळी दिली.

यावेळी शिवसेना प्रवक्ते आणि कार्यक्रमाचे निमंत्रक नरेश म्हस्के, लेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, ग्रंथाली प्रकाशनाच्या धनश्री धारप, प्रकाशन सोहळ्याचे समन्वयक जयु भाटकर, मंदार टिल्लू, डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने, सान्वी ओक, प्रा. सुयश प्रधान, प्रा. हर्षला लिखिते आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा : 

विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत…, जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version