Kalyan लोकसभा मतदारसंघात महिलांसाठी असणार विशेष ‘पिंक मतदान केंद्र’

मतदान प्रक्रियेमध्ये महिला कर्मचारी व महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण लोकसभा अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक पिंक मतदान केंद्र बनवण्यात आले आहे.

Kalyan लोकसभा मतदारसंघात महिलांसाठी असणार विशेष ‘पिंक मतदान केंद्र’

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या (सोमवार, २० मे) पार पडणार आहे. राज्यातील तेरा मतदारसंघांमध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काल (शनिवार, १८ मे) प्रचाराचा शेवटचा दिवस पार पडला.आता मुंबई ठाण्यासह राज्यातील तेरा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या या टप्प्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये महिला कर्मचारी व महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण लोकसभा अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक ‘पिंक मतदान केंद्र’ (Pink Voting Booth) बनवण्यात आले आहे.

मतदान प्रक्रियेमध्ये महिला कर्मचारी व महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण लोकसभाअंतर्गत (Kalyan Loksabha Constituency) प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक पिंक मतदान केंद्र बनवण्यात आले आहे. यामध्ये सर्व महिला अधिकारी, कर्मचारी असणार आहेत तसेच सुरक्षेसाठी देखील महिला पोलीस कर्मचारी असणार आहेत. मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी तसेच महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा हे उद्दिष्ट समोर ठेवत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तसेच मतदान केंद्रावर नाव शोधण्यासाठी मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नये त्याकरिता निवडणूक आयोगाकडून (Election commission) प्रत्येक मतदान केंद्रावर अल्फाबेटिकल रोल लोकेटर ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून मतदार आपले नाव सहजरित्या शोधू शकतील. त्याचबरोबर कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख १८ हजार ९५८ मतदार आहेत तर एकूण १९६० मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत विविध शासकीय यंत्रणांचे मिळून ११ हजार कर्मचारी काम करत आहेत तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली असून २०० पोलीस अधिकारी, १८०० पोलीस कर्मचारी, ९५० होमगार्ड, एसआरपीएफ, सीएपीएस च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले आहे.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version