spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

TMC आयुक्तांनी घेतला पोस्ट कोविड सेंटर व विकासकाकडून प्राप्त होणाऱ्या नवीन इमारतीचा आढावा

Thane : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती.

Thane : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय दुसरीकडे स्थलांतरीत करावे जेणेकरुन रुग्णालयाचे विस्तारीकरणासाठी अधिकची जागा उपलब्ध होवून रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य होईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या होत्या, या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर इमारतीची पाहणी करुन आढावा घेतला.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत आहे. येथे नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधांसाठी जागेची गरज लक्षात घेता येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व वसतीगृह स्थलांतरीत करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर वा शहर विकास आराखड्यातंर्गत राखीव असलेल्या जागेत विकसकाकडून प्राप्त होणाऱ्या १२ मजली इमारतीत महाविद्यालय व वसतीगृह लवकरच स्थलांतरीत करता यावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, उपनगर अभियंता रामदास शिंदे आदी उपस्थित होते. माजिवडा येथील ठाणे महापालिकेची पोस्ट कोविड सेंटर इमारत पाच मजली असून कोविड १९ च्या कालावधीत या इमारतीत कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना पोस्ट कोविडनंतर घ्यावयाची काळजी या संदर्भात समुपदेशन केले जात होते. सद्य:स्थितीत या ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत, त्यामुळे या इमारतीत बहुतांश जागा मोकळी असून या जागेचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने नियोजन करावे असे आयुक्त श्री. बांगर यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान संबंधितांना सूचित केले. तसेच नव्याने उपलब्ध होत असलेल्या बारा मजली इमारतीत किंवा सद्यस्थितीत ताब्यात असलेल्या पोस्ट कोविड सेंटरच्या इमारतीमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरीत करावे, या ठिकाणी आवश्यकतेनुसार वर्गखोल्या, प्रयोगशाळेची निर्मिती, कँटीन यासाठी नामांकित वास्तुविशारद नेमून वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करुन महाविद्यालयाचा वास्तुविशारदीय आराखडा तयार करुन त्या आधारे आवश्यकतेनुसार स्थापत्य कामांमध्ये बदल करणे, फर्निचर व साहित्य पुरवठा ही कामे करुन सदर कामांची कालमर्यादा निश्चित करुन दिलेल्या कालमर्यादेत सदरची कामे पूर्ण होतील याची दक्षता घेण्यात यावी याबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

या पाहणी दौ-यात विकासकाच्या माध्यमातून नव्याने तयार होत असलेल्या इमारतीची देखील माहिती घेवून सदर इमारत महापालिकेच्या ताब्यात लवकरात लवकर येईल या दृष्टीने शहर विकास विभागाने पाठपुरावा करावा व सदर इमारत आरोग्य खात्याकडे हस्तांतरीत करावी. तसेच वैद्यकीय कामासाठी आवश्यक असलेली सर्व कामे संबंधितांकडूनच करुन घेण्यात यावी. तसेच या दोन्ही इमारतींची संपूर्ण माहिती शहर विकास विभागाने सादर करावी असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. पोस्ट कोविड सेंटर येथे सद्यस्थितीत फिजीओथेरपी व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात असून पोस्ट कोविड सेंटर व फिजीओथेरपी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध करुन स्थलांतरीत करण्यात यावे असेही निर्देश आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले.

भविष्यात नवीन इमारतीमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व वसतीगृह पूर्णपणे स्थलांतरीत झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होणार आहे, या जागेमध्ये सद्यस्थितीत रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण असणाऱ्या विभागाचे विस्तारीकरण करुन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता पाचशेवरुन एक हजार खाटांपर्यत करणे शक्य होणार आहे. या माध्यमातून अधिक चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देता येईल व रुग्णालयामध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

पोस्ट कोविड इमारतीची पाहणी करीत असताना येथील दुसऱ्या मजल्यावरील औषधी भांडारगृहाची पाहणी केली. या ठिकाणी वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. सदर साहित्याचे ऑडिट करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच सदर परिसर अस्वच्छ असल्याचे आढळून आले, त्याबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यकत करुन याबाबत संबंधित भांडारगृहाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांना दिले.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss