TMC व आर. निसर्ग फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती मोहिम

Thane : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेस दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मागील काही महिन्यांपासून अधिक गतीमानतेने काम व्हावे या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे मोहिमेतंर्गत शहरामध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे

TMC व आर. निसर्ग फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती मोहिम

Thane : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेस दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मागील काही महिन्यांपासून अधिक गतीमानतेने काम व्हावे या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे मोहिमेतंर्गत शहरामध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. निश्चितच ठाणे शहर सुंदर व स्वच्छ शहर दृष्टीस पडत आहे. ठाणे शहर स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. ठाणे महानगरपालिका व ठाण्यातील आर. निसर्ग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कचरा वर्गीकरणाबाबत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगळी – वेगळी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सुलोचनादेवी सिंघानिया या शाळेचे विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांमध्ये जनजागृती करणार असून प्रत्यक्ष कामास त्यांनी सुरूवात देखील केलेली आहे. या संदर्भात आयुक्त अभिजीत बांगर यांनी आर निसर्ग स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार,आर. निसर्ग फाऊंडेशनच्या डॉ. लता घनश्यामनानी, सुलोचना सिंघानिया शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. नरीमन पाँईट, मुंबई येथे नगरविकास दिनानिमित्त झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात ठाणे महानगरपालिका व आर. निसर्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यानी कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत सादरीकरण केले. या सादरीकरणातून त्यांनी महात्मा गांधीजीच्या तीन माकडांनी दिलेल्या ‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा ना देखो’ या संदेशाचा आधार घेत स्वच्छतेबाबतही ‘सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा’ असे वर्गीकरण करा असा संदेश देत असतानाच आपल्या घराप्रमाणे आपला परिसर व शहरही स्वच्छ ठेवले पाहिजे अशी जनजागृतीही त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून केली. आज या विद्यार्थ्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेवून या मोहिमेबद्दल अधिक माहिती देत संवाद साधला. यावेळी ओला कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा, सुका कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा, व घरगुती घातक कचऱ्यासाठी काळा रंगाचा डबा वापरावा हे विद्यार्थ्यांनी विषद केले. यावेळी आयुक्त बांगर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे ५०० शालेय विद्यार्थी हे उन्हाळयाच्या सुट्टीत घरोघरी जावून नागरिकांनामध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या जनजागृतीची सुरूवात निश्चितच त्यांच्या स्वत:च्या घरापासून होण्यास मदत होईलच त्यामुळे समाजात देखील सकारात्मक बदल नक्कीच घडेल व युवा पिढीच्या माध्यमातून होणारा बदल हा स्वच्छ वातावरण, निरोगी जीवन व पर्यावरणाचे रक्षण करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी आर. निसर्ग फाऊंडेनने व्यक्त केला.

शालेय जीवनातच मुलांमध्ये देशाप्रती प्रेम निर्माण करुन त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये विविध उपक्रमांबाबत जनजागृती केल्यास ती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यत पोहचण्यास मदत होणार आहे. आगामी काळात या मोहिमेमध्ये ठाण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत, जेणेकरुन सदर मोहिम कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांने या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे व आर.निसर्ग फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले तर यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Exit mobile version