राज्यसरकार करणार मुंबईतील एअर इंडिया बिल्डिंग खरेदी, मंत्रालयाचे विस्तार या वास्तूत होणार

राज्यसरकार करणार मुंबईतील एअर इंडिया बिल्डिंग खरेदी, मंत्रालयाचे विस्तार या वास्तूत होणार

मुंबईत असलेली एअर इंडिया बिल्डिंग राज्य सरकार खरेदी करण्याच्या तयारीत असून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी मंत्रालयाचा विस्तार करण्याचं सरकार नियोजन करत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले होते. एअर इंडिया कंपनी टाटा समूहाला विक्री केल्यानंतर मुंबईतील एअर इंडियाची बिल्डिंग केंद्राच्या अंतर्गत आली आहे. ही बिल्डिंग राज्य सरकारला हस्तांतरित करावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. ही बिल्डिंग जर राज्य सरकारला मिळाली तर त्या ठिकाणी मंत्रालयाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात १९७४ साली नरिमन पॉईंट या समुद्र किनारी असलेल्या प्राइम लोकेशनवर या इमारतीचा काम पूर्ण झालं. एकूण १०,८०० स्क्वेअर फूटमध्ये ही २३ मजल्याची एअर इंडियाची ही टोलेजंग इमारत मुंबईकरांसाठी एक वेगळंच आकर्षण आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात या एअर इंडिया बिल्डिंगला लक्ष करत बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता.

एअर इंडियाचे मुख्यालय २०१३ साली दिल्लीत हलवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील एअर इंडियाच्या बिल्डिंगमधील २३ मजल्यांपैकी १७ मजले एअर इंडियाने भाडेतत्त्वार दिले होते. एअर इंडियाने हे बिल्डिंग विक्रीसाठी काढल्यानंतर २०१९ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने ही बिल्डिंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्याने हे काम बारगळलं.

शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एअर इंडियाची बिल्डिंग खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राज्य सरकारने पुन्हा एकदा ही बिल्डिंग खरेदी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळावी या संदर्भात चर्चा केली.

एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळाल्यास मंत्रालयातील विविध विभागाच्या शासकीय कार्यालयांचा विस्तार या एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये केला जाईल, जेणेकरून विविध विभागाची शासकीय कामे जलद गतीने होतील. शिवाय मंत्रालयातील रोजची होणारी गर्दीसुद्धा विभागली जाऊन नियंत्रणात येईल.

 

हे ही वाचा:

मोदी सरकारची मोठी घोषणा; ७५ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरीचं ऑफर लेटर

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले?,वाचा सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version