Sunday, July 7, 2024

Latest Posts

वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

भरती प्रक्रियेत टीसीएस (TCS) आयओएन (ION) कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पडतील.

वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा आता संपली असून १२५६  वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत होते. वनमंत्र्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेला आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून बाकी राहिलेल्या १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख ९५ हजार ७६८ परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यातील एकूण दोन लाख ७१ हजार ८३८ परीक्षार्थी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस (TCS) आयओएन (ION) कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पडतील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची २५ कि.मी. आणि १६ कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.

ही सर्व प्रक्रिया १७ जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात ४४ दिवसात, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात ४० दिवसात तर उर्वरित चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), यवतमाळ (Yavatmal), छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhajinagar ), धुळे (Dhule), नाशिक (Nashik), पुणे (Pune) याठिकाणी २० दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम प्रवेश शिवसेनेत प्रवेश

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss