वारी, वारकरी आणि भक्तीमय वातावरण…

वारी ही प्रत्येक वारकऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी फार महत्वाची असते. जेव्हा जेव्हा पवित्र-आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी जवळ येतात, तेव्हा पंढरपूर भगवान विष्णूचा अवतार असलेल्या आपल्या लाडक्या विठोबाला भेटायला येणाऱ्या ‘वारकऱ्या’ या यात्रेकरूंच्या समूहाचे स्वागत करताना आनंदी होते. दरवर्षी आषाढ महिन्यातील तेजस्वी चंद्राच्या ११ व्या दिवशी अनेक भक्त पंढरपूर मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. २०२३ मध्ये, देहू, पुणे येथून तुकाराम महाराजांची पंढरपूर वारी पालखी १० जून २०२३ रोजी सुरू झाली आहे तसेच आळंदी येथून संत ज्ञानेश्वर पालखीला ११ जून रोजी सुरुवात झाली आहे.

आषाढाची चाहूल लागताच प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला प्रचंड ओढ लागते ती म्हणजे पंढरीच्या वारीची आणि आपल्या विठुरायाला भेटण्याची.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती.

 

विठूरायाच्या वारीला जाणे हा प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यातील खूपच आनंदाचा क्षण असतो. अन्य शब्दांमध्ये वारी ला जाणे म्हणजे एक प्रकारचे स्वर्गसुखच.

 

हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.

 

वारकरी दरवर्षी वारीत पारंपारिक फुगड्या आणि टाळ मृदंगावर ठेका धरतात. तसेच पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण होते.

 

दरवर्षी वारीला येणारे वारकरी हे इंद्रायणी नदीत अंघोळ करतात,यामुळे इंद्रायणी नदीचा घाट आणि परिसर सर्व आलेल्या वारकरी मंडळींच्या गर्दीने गजबजून जातो.
Exit mobile version