महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इतिहासात प्रथमच तथागत बुध्दांची आराधना, हे आधी कधी घडलं नव्हतं, CM Shinde यांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इतिहासात प्रथमच तथागत बुध्दांची आराधना, हे आधी कधी घडलं नव्हतं, CM Shinde यांनी व्यक्त केल्या भावना
बौद्ध धम्मातील पवित्र वर्षावासनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आली.

यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अभिजित गायकवाड तसेच बौद्ध भिक्खू महासंघाचे राज्यभरातून आलेले सर्व बौद्ध भिक्खू उपस्थित होते.
यावेळी आदरणीय भन्ते यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भोजनदान केले.
यावेळी बौद्ध धम्माचे उपासक वर्षा निवासस्थानी आल्यामुळे सुखाचा वर्षाव झाल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
आपले सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे असून राज्यात सामाजिक सलोखा नांदण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

भिक्खू संघांच्या काही असामान्य भन्तेजींचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यांना चीवरदान देण्याची संधी मिळाली, हे अहोभाग्य असल्याच्या भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
Exit mobile version