४० आमदारांनी शिवसेना सोडल्याचं जाहीर करावं – संजय राऊत

लोकांमध्ये उगाच संभ्रम निर्माण करु नये असे राऊत यांनी म्हटले. 

४० आमदारांनी शिवसेना सोडल्याचं जाहीर करावं – संजय राऊत
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फोटो शेअर करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त केली. उध्दव ठाकरेंवरील टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही बंडखोर आमदारांनी किरीट सोमय्या यांना दिला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत थेट बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. लोकांमध्ये उगाच संभ्रम निर्माण करु नये असे राऊत यांनी म्हटले.
ही अशी वक्तव्य लोकांमधे फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी केली जात आहेत. हे सगळे डावपेच आहेत. ते शिवसेनेत नाहीत. विधिमंडळात त्यांनी शिवसेनेचा गट स्थापना केला. पण शिवसेने शिवाय त्यांचे अस्तित्व काहीच नाही. ते सर्व भाजपमध्ये मनाने विलीन झालेत. तनाने ही झालेत आणि धनाने तर केव्हाच झाले आहेत. असा टोला संजय राऊत यांनी ४० आमदारांना लगावला आहे. ते आमचे सहकारी होते, त्यांनी असे खेळ करू नये असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांची हिम्मत असल्यास शिवसेना सोडल्याचं त्यांनी जाहीर करावे. असे आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.
अशी वक्तव्य करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका. त्यापेक्षा शिवसेनेत रहायचे नाही हे स्पष्टपणे बोलून मोकळे व्हा. तुमच्या अशा वक्तव्यांनी लोकांची दिशाभूल करू नका. ते शक्य होणार नाही. तुम्ही शिवसेना सोडली असं म्हटलं तर तुमची आमदारकी जाईल. मी शिवसेनेचा आमदार नाही असं बोलून दाखवा. राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. असं आव्हान संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे.
Exit mobile version