बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असतील, तर भाजपा सरकार त्यांच्या क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय?: Aaditya Thackeray यांचा सवाल

बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असतील, तर भाजपा सरकार त्यांच्या क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय?: Aaditya Thackeray यांचा सवाल

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (बुधवार, १८ सप्टेंबर) भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. बांगलादेशात झालेल्या उठावानंतर निर्माण झालेल्या धार्मिक तेढीवर भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणात रान उठवले होते. आता बांगलादेश क्रिकेट संघ हा भारत दौऱ्यावर असून त्याविषयी आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? असा सवाल विचारात आदित्य ठाकरे यांनी, “भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना?” अशी शंका उपस्थित केली आहे.

बांगलादेशमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात नागरिकांनी उठाव करत त्यांना सत्तेवरून पायउतार केले होते. त्यानंतर समाजमाध्यमे आणि माध्यमांवर बांगलादेशी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. यावरूनच भाजप नेते बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर मोठ्या प्रमाणात भाष्य करत होते. यावरूनच, आता आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट चर्चेत

आदित्य ठाकरे ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले, “बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे… BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात! आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का? जर खऱ्या असतील, तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकार वर कोणाचा दबाव आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, “आणि जर ह्या बातम्या खोट्या असतील तर, सोशल मिडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या ह्या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना? हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेलं ह्यांचं हिंदुत्व? की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं?” अश्या शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version