Abdul Sattar: अब्दुल सत्तार म्हणतात मी ‘सुरक्षित’…

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत सापडले आहे.

Abdul Sattar: अब्दुल सत्तार म्हणतात मी ‘सुरक्षित’…

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. राज्यभरातून होत असलेल्या टिकेनंतर सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी देखील मागितली आहे. मात्र विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, आता राजीनाम्याच्या मुद्यावरून खुद्द सत्तार यांनीच सूचक विधान केले आहे. मी ‘सुरक्षीत’ असल्याचं सूचक वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घेण्याचे टाळले असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान या सर्व घडामोडीनंतर आज पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करून स्वागत केले आहे. सत्तार यांचे अशाप्रकारे स्वागत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अब्दुल सत्तार यांनी आज हजेरी लावली. यावेळी त्यांनी पीक विमा संबधित आढावा घेतला. तर पीक विमा कंपन्याचे अधिकारी देखील या बैठकीत हजर होते. दरम्यान बैठक संपल्यावर सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राजीनामा देण्याची मागणी केली जात असल्याचा प्रश्नाला उत्तर देणं सत्तार यांनी टाळले. मात्र याचवेळी बोलतांना ‘मी सुरक्षीत, मी सुरक्षीत’ असं सूचक वक्तव्य सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे सत्तार यांचा राजीनामा घेणार नसल्याची चर्चा पाहायला मिळू लागली आहे.

शिंदे गटावर ‘पन्नास खोके’बद्दल होणाऱ्या आरोपांवरून टीका करतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर आणि शिंदे सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका झाली. तर सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला देखील केला. त्यानंतर सत्तार यांनी माफी देखील मागितली. पण अजूनही विरोधकांकडून राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. अशात अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी सत्तार हे औरंगाबादच्या विश्रामगृहात आले असतांना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सत्तार यांच्या अंगावर टाकण्यात आल्या. एखांदा विजय मिळवल्यासारखा सत्तारांचे करण्यात आलेल्या या स्वागतामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version