spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांनी केला थेट सवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बाजू मांडतात तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत ?

आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी ठराव करण्याची मागणी केली आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी ठराव करण्याची मागणी केली आहे. पण आपला ठराव अजून आला नाही. तिकडे एक इंच जमीनही महाराष्ट्राला न देण्याचा ठराव कर्नाटक सरकारने केला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अशा प्रकारे अँग्रेसिव्हली कर्नाटकाची बाजू मांडताना दिसतात. तसे आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बाजू आक्रमकपणे का मांडत नाहीत? असा सवाल करतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बाजू का आक्रमकपणे मांडत नाहीत याचं उत्तर शिंदे-फडणवीस यांनी द्यावं, असं आवाहनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं.

“आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. आम्ही मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सांगतिलं होतं, आणि त्यांनीही मराठी भाषिकांना दिलासा देण्यासाठी, मदत करण्यासाठी तसा संदेश देण्याची गरज असल्याचं मान्य केलं होतं. आपण दोन्ही सभागृहात एकमताने ठराव करु सांगितलं होतं. पण अजून आपला ठराव आलेला नाही आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र एक इंच जागा देणार नाही असा ठराव करुन मोकळे झाले,” अशी टीका अजित पवारांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की “कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडला आहे. याचं उत्तर त्यांच्याकडून आलं पाहिजे”.

‘कर्नाटकची भूमी, पाणी, भाषा आणि कन्नडिगांच्या हितामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्याला धक्का लागत असेल तर घटनादत्त आणि कायदेशीर मार्गाने रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत,’ असे बोम्मई यांनी मांडलेल्या ठरावात म्हटले आहे. विशेष म्हणजे सध्याचा वाद हा महाराष्ट्राने नाहक निर्माण केल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘चीन ज्याप्रमाणे भारतात घुसला, तसे आम्ही कर्नाटकात घुसू,’ असे विधान केल्याचा दावा करत ते चीनचे हस्तक आणि देशद्रोही असल्याचा आरोपही बोम्मई यांनी सभागृहात केला. बोम्मई यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्याबद्दल जयंत पाटील यांचाही निषेध करण्यात आला. तत्पुर्वी, ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही राऊत यांचा निषेध केला. ‘आपण संघराज्य पद्धतीमध्ये राहात आहोत, देशात संसदीय लोकशाही आहे याचा त्यांना विसर पडला आहे का? त्यांना नागरी जीवन आणि संस्कृतीची अजिबात जाण नाही,’ अशा शब्दांत सिद्धरामय्यांनी टीका केली. ‘महाजन समितीचा अहवाल अंतिम असून एक इंचही जमीन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शांतता राखण्याबाबत दिलेल्या निर्देशांचे महाराष्ट्राकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप कर्नाटक विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावात करण्यात आला आहे. याचा दोन्ही राज्यांच्या संबंधांवर परिणाम होत असून, महाराष्ट्राने स्वत:ला आवरले पाहिजे, असे सांगत हा मुद्दा केंद्राच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही ठरावात म्हटले आहे.

“जयंत पाटील गेल्या ३२ वर्षांपासून सभागृहाचे सदस्य असून, त्याचं वागणं, बोलणं, कारकिर्द सर्वांनी पाहिली आहे. ते काही अध्यक्षांना निर्लज्जासारखं काम सुरु आहे म्हणाले नाही. मी पण ३०-३२ वर्षं काम करत आहे. अनेकदा आपण सरकारला काही लाज आहे की नाही म्हणत असतो. सरकार निर्लज्जासारखं वागत आहे अशी विधानं सभागृहात करण्यात आली आहेत. पण हे फार सोयीचं राजकारण करतात,” अशी टीका यावेळी अजित पवारांनी केली.

पुढे ते म्हणाले की “छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजतात असं विधान केल्याने इतका गोंधळ घालण्यात आला. पण याआधी विरोधी पक्षनेते म्हणून फडणीसांनी काम पाहिलं तेव्हा मुंबईला सोन्याची कोंबडी अशी उपमा दिली होती. सागर म्हणून आमदार आहेत त्यांनी तशीच उपमा दिली आहे. प्रवीण दरेकरांनीही तसा उल्लेख केला होती. यांची लोकं बोलली की सगळं योग्य आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातील काही सहकारी बोलले की सत्तेच्या, बहुमताच्या जोरावर कामकाज थांबवायचं. मग माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा अशा वल्गना करणं हे योग्य नाही”.

“सभागृहात महागाई, बेरोजगारी यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण त्यांना बगल देत वेगळे विषय पुढे आणले जात आहेत. दिशाचं प्रकरण काढायचं काहीच कारण नव्हतं. सीबीआयनेही सुशांत प्रकरणाची चौकशी केली आहे. सरकारमधील व्यक्तींवर आरोप होत असताना दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा सुरु आहे. जुन्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे,” अशी टीका अजित पवारांनी केली आहे. “जर सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती असेल तर त्याची कोणतीही चौकशी होत नाही. उलट चौकशी बंद करुन क्लीन चिट दिली जाते. विरोधी पक्षात असाल तर बंद झालेल्या चौकशा पुन्हा सुरु कऱण्यचा विडा या सरकारने उचलला आहे. गेल्या सहा महिन्यात अशी अनेक उदाहरणं आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला.

हे ही वाचा:

भारतात BF.7 Variant चे ४ रुग्ण, आरोग्य मंत्र्यांची बोलावली महत्वाची बैठक, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, चर्चांना आलं उधाण

Maharashtra Assembly Winter Session 2022 विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, राष्ट्रवादीसह विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss