राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर,पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवार यांची मागणी

आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर,पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवार यांची मागणी

MAHARASHTRA ASSEMBLY WINTER SESSION 2022 : आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णालयांमध्ये औषधे व इतर सामुग्री उपलब्ध ठेवावी. डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग पुरेसा ठेवावा. नवीन रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करताना आधीच्या रुग्णालयातील स्टाफची पळवापळवी करु नये. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

महाराष्ट्राच्या उपराजधानीत, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयासारख्या आशियातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या रुग्णालयात एका तरुणीला व्हेंटीलेटर उपलब्ध होऊ शकला नाही. तिचे आई-वडिल अंबूबॅगचा फुगा दाबून तब्बल वीस तास तिला कृत्रीम श्वासोच्छवास देत होते. तरीही त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासह इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वर्षभरात बाह्य व आंतररुग्ण मिळून दहा लाखापेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी अधिकचे लक्ष देण्याची गरज आहे.महाविद्यालयाचे रुग्णालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही दोन्ही रुग्णालये गोरगरीब जनतेचा आधार आहेत. दोन्ही रुग्णालयात खाटा समान असतानाही मेयोमध्ये मेडिकलच्या तुलनेत अर्धाच कर्मचारी वर्ग येथे कार्यरत आहे. तसेय या रुग्णालयात वारंवार औषधांचा तुटवडा असतो. या समस्या अत्यंत गंभीर आहेत. राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयाची स्थिती सुधारण्यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे तसेच व्हेंटीलेटरअभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

ऑटीझम (स्वमग्नता) हा आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मतीमंद मुले आणि स्वमग्न मुले या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. स्वमग्न मुलांना सगळ्या थेरपी एकत्र मिळण्याची आवश्यकता असते. ऑटीझम रुग्णांना जिल्हा पातळीवर तातडीने निदान आणि उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

ऑटीझम (स्वमग्नता) झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागात काही प्रमाणात यावर उपचार मिळत आहेत, मात्र ग्रामीण भागात या आजारांवर उपचार मिळत नाहीत. या आजाराचे लवकर निदान झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर ऑटीझम सेंटरची निर्मिती करण्यात यावी.महाविकास आघाडी सरकार असताना प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी अशी सेंटर झाली तर लवकर ऑटीझमग्रस्त मुलांवर तातडीने उपाचार होतील. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या किमान जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर्स उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

हे ही वाचा : 

WINTER SESSION 2022 च्या पहिल्याच दिवशी शिंदेचा मोठा दावा; बोम्मईंच्या फेक ट्विटमागे कोणचा हात! |

Maharashtra Winter Session 2022 आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version