Akshay Shinde Encounter: कुणाला वाचविण्यासाठी Shinde-Fadnavis हा बनाव करत आहेत? Sanjay Raut यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: कुणाला वाचविण्यासाठी Shinde-Fadnavis हा बनाव करत आहेत? Sanjay Raut यांचा सवाल

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवार २३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या गुन्ह्यातील चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून तळोजा कारागृहातून ठाणे येथे घेऊन जात होते. यादरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावली. आरोपीने बंदुकीतून तीन राउंड फायर केल्या. त्यावेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अक्षय शिंदेला कळवा येथील शासकीय रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. पण जर अक्षय शिंदे याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे एक ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राला सत्य कळायला हवे, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत? 

याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे-फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे! असे ट्विट उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

सुरुवातीला अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समजले होते. परंतु पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येताच राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या  प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, याप्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीदेखील विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे पोलीस यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version