काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे.

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे भास्करराव खतगावकर यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. “भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाईल. भास्कराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील”,असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा माझ्या घरी आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो पण आता घरी आलो आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे खतगावकर म्हणाले.

हे ही वाचा:

चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र
गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version