spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदिवासी विभागाला एवढा निधी दिला जातो मग आदिवासी समाजाचा विकास का नाही भुजबळांचा सरकारला सवाल

केवळ दोन हजार रुपये आणि मेंढ्यांच्या बदल्यात मुलांना वेठबिगारीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राज्यातील काही भागात घडला आहे.

केवळ दोन हजार रुपये आणि मेंढ्यांच्या बदल्यात मुलांना वेठबिगारीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राज्यातील काही भागात घडला आहे. ही बाब देशाला आणि राज्याला मान खाली घालणारी असून आदिवासींच्या उत्थानासाठी उपाययोजना या सरकारला कराव्या लागतील असे मत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे सभागृहात मांडले.

नाशिक जिल्ह्यासह, अहमदनगर, ठाणे,पालघर,रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या बालमजुरांना वेठबिगारीस ठेवल्याबाबत व यातील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याबाबत कातकरी समाजाच्या गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेवून नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या अनेक बालमजुरांना वेठबिगारीस ठेवल्याच्या घटना सप्टेंबर २०२२ मध्ये निदर्शनास आल्या आहे. सप्टेंबर २०२२ च्या पहिल्या सप्ताहात व त्या सुमारास उभाडे (ता.इगतपुरी, जि.नाशिक) येथील आदिवासी पाड्यावरील १० वर्षाच्या मुलीचा वेठबिगारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयात विकत घेवून त्यांच्यावर अत्याचार करत मजुरी करून घेतली. सदर वेठबिगारी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे. मात्र बेपत्ता मुलांचा आणि फरार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून दिरंगाई व टाळाटाळ केली जात असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना पैशांसाठी वेठबिगारीकरीता विकण्याचा प्रकार दुर्देवी असून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या ? आदिवासी विकास विभागाला मोठा निधी दिला जातो मात्र तो या गरीब आदिवासी बांधवापर्यंत पोहोचत नाही ? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. एवढी भीषण गरीबी या आदिवासी लोकांमध्ये असते नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात १८ पेक्षा अधिक मुलांची वेठबिगार म्हणून त्यांच्याच पालकांकडून विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजाला आपण थेट मदत मिळावी यासाठी कार्यवाही करणार आहोत की नाही अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली.महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाला थेट निधी मिळतो त्याला वित्त विभागाच्या परवानगीची गरज नसते, मग असे असताना राज्य सरकारच्या योजना या त्या बांधवांपर्यंत का पोहोचत नाही.२७ वर्ष झाले असतील आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो याचे कारण त्यांची भीषण गरीबी हे आहे मात्र आजही त्यांची परिस्थिती सुधारली जात नाही. त्यांचा विकास का होत नाही? वनविभागाचे कायदे आपल्याकडे कडक आहेत अनेकवेळा त्यांना त्याचा फटका बसतो. त्यासाठी काही वेगळे पर्याय आपल्याला शोधता येतील काय? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

आदिवासी आणि वन परिक्षेत्र असल्यामुळे अनेक भागात उद्योगधंदे उभे राहू शकत नाही त्यामुळे पर्यटनाच्या आधारे त्यांना मदत देऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे. राज्यात आदिवासी विभागाच्या ५०० च्या वर आश्रमशाळा आहेत. परंतु, त्या ठिकाणी विद्यार्थी केवळ पोटार्थी म्हणून येतो. घरी उपाशी राहतो म्हणून निदान आश्रमशाळेत पोटभर अन्न मिळेल या आशेने विद्यार्थी शाळेत येतात. जर आपल्या मुलांची अशी आबाळ होत असेल तर शेवटी त्यांना वेठबिगारीसाठी पाठविले जाते. आदिवासी समाज आज प्रगतीसाठी धडपड करतो आहे. या समाजातील मुले उच्चशिक्षण, चांगल्या रोजगाराची स्वप्ने बघताहेत. त्यांना साथ हवी आहे ती सरकारी यंत्रणांची यासाठी सर्वव्यापी विचार व्हावा अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. तसेच मुंबईत काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता त्यात मागणी होती की आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात विनोबा भावेंनी सब भूमी गोपालकी या न्यायाने भूमीहिनांना जमिनी देण्यासाठी भूदान चळवळ राबवून मोठे योगदान दिले. आज शासनाच्या, वनजमिनींचेदेखील आदिवासींना, भूमीहिनांना वाटप होणे गरजेचे असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुधारल्या पाहिजेत. मुलांचे आरोग्य, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, मुलींची सुरक्षितता, मुलींचे होणारे लैंगिक शोषण थांबले पाहिजे. पेसा कायद्यांतर्गत शासनाच्या प्रत्येक खात्यात केवळ आदिवासी शिक्षितांची नोकर भरती झाली पाहिजे. दुर्गम भागात दळणवळणाची साधने आणि पक्के रस्ते बांधले पाहिजेत. पाझर तलाव, शेततळी, लघुपाटबंधारे बांधून पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लावला पाहिजे. वाड्या -पाड्यावर, हाकेच्या अंतरावर किमान प्राथमिक दवाखाना झाला पाहिजे. शेती विकासाच्या योजना राबवल्या पाहिजे. उच्चशिक्षितांना बेकारभत्ता दिली पाहिजे. त्यांना आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, घरुकुल यासह विविध उपाययोजना करायला हव्यात अशी भूमिका छगन भुजबळ यांनी सभागृहासमोर मांडली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सहभाग घेऊन वेठबिगारीस प्रवृत्त करणाऱ्या आणि मुलांच्या विक्री करणाऱ्या एजंटला शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सभागृहाने यावर गंभीर विचार करून याबाबत कायदा तयार करावा अशी मागणी केली.

यावेळी उत्तरात मंत्री सुरेश खाडे यांनी आदिवासी कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याबाबत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असून वेठबिगारीत आधारलेली एकूण २४ मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत तसेच त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत शासनाच्यावतीने देण्यात आली असून केंद्रशासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. तसेच याबाबत आवश्यक ते उपक्रम तातडीने राबविले जातील. आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार त्याचप्रमाणे आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

हे ही वाचा : 

वर्षाच्या सुरुवातीलाच मुबईकरांचा खिसा होणार रिकामा !, वीजबिल आणि पाणीपट्टीत होणार ‘ इतक्या’ टक्यांनी वाढ

Coronavirus चीनमध्ये कोरोना वाढण्यामागचे प्रमुख कारण आले समोर, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा प्रकार

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर,पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवार यांची मागणी

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss