spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबईत भाजपचं ‘माफी मांगो’ आंदोलन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केले आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपानेही कंबर कसली आहे. आता उद्या भाजपाही रस्त्यावर उतरणार आहे. भाजपाही उद्या मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांनाही लक्ष्य केलं.

“मविआकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपाही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसंच संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. त्याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही ‘मविआ’ला रस्त्यावर उतरुनच उत्तर देऊ. उद्या मुंबई भाजपाकडून ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ आंदोलन केलं जाईल. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार यात सहभाही होतील”, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहेत. एखादं संकट आल्यावर शेतकऱ्याला ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“तालिबानच्या भागात गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर हल्ला झाल्याचं आम्ही पाहिलं होतं. आता शांततापूर्ण आणि शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असणारा समाज आणि त्यातही आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण केला जात आहे. हे का केलं जात आहे हा आमचा प्रश्न आहे,” असं शेलार म्हणाले. “आपलं अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊतांनी सोडलेली नाही. डॉक्टर चांगली औषधं देतो की कंपाऊंडर या वादात मला पडायचं नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला. यांची मस्ती आंबेडकरांच्या जन्मस्थळापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणं अक्षम्य चूक आहे असंही त्यांनी म्हटलं.

संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचा उल्लेख केला. त्यामुळे आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की आंबेडकरांचा जन्म नेमका कुठं झाला आहे. याचा अभ्यास त्यांना व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तकं राऊतांना भेट म्हणून पाठवणार आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा : 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा

Avatar The Way of Water २०२२ चा अखेरचा महिना अवतार साठी ठरणार लाभ दायक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss