मुख्यमंत्री शिंदेंनी एका बैठकीत वाचली नव्या पुस्तकाची ‘इतकी’ पानं!

मुख्यमंत्री शिंदेंनी एका बैठकीत वाचली  नव्या पुस्तकाची ‘इतकी’ पानं!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून आजतागायत त्यांना फुरसत मिळालेली नाही. त्यातही स्वतःसाठी चित्रपट किंवा नाटक पाहण्याकरता किंवा मनोरंजनाकरता इतकंच काय पण पुस्तक वाचनाकरता देखील त्यांना वेळ मिळालेला नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर धावपळ करणा-या मुख्यमंत्र्यांनी एक मराठी पुस्तक वाचण्यासाठी मात्र वेळात वेळ काढलाय. या नव्या को-या पुस्तकाच्या वाचनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क वेळ काढला आणि एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाची इतकी पान वाचलीत की ती ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांची धावपळ माहिती असलेल्या किंवा ती दगदग वृत्तवाहिन्यांवर बघणाऱ्या अनेकांना अचंबित व्हायला होईल अशी माहिती दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे.

हेही वाचा : 

जितेंद्र आव्हाड प्रकरणी नीलम गोऱ्हेंनी दिली प्रतिक्रिया, थेट कंगनाशी केली केतकी चितळेची तुलना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुस्तक वाचण्यासाठी काढलेल्या वेळाचं कारणही तितकंच खास आहे. राज्यात आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजकीय करिष्म्याची पेशी केली. शिवसेनेतील ४० आमदारांसहित उठाव केल्यानंतर ‘न भूतो’ असं राजकीय सत्तांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घडविण्यात आलं. याच सगळ्या नाट्यमय घटनांवर आणि घडामोडींवर ‘इंकींग इनोवेशन्स’ आणि आनंद लिमये यांनी एका खळबळजनक पुस्तकाची निर्मिती केली आहे. जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाने मराठी वाचकांची अल्पावधीतच पसंती मिळवली आहे. वेगवेगळ्या स्तरातील वाचकांनी या पुस्तकाबद्दल प्रकाशकांकडे, संपादकांकडे आणि लेखकाकडे दूरध्वनीवरून, ई-मेलवरून आणि प्रत्यक्ष भेटून गौरवोद्गार काढलेले आहेत. मात्र यात भर पडली आहे ती आणखी एका खास व्यक्तीची. ती व्यक्ती आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतरावर लिहिण्यात आलेले हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत हे पुस्तक सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या टीम मधील एका जेष्ठ सहकार्याच्या हाती लागलं. त्यांनी हे पुस्तक वाचून त्यातला मतितार्थ रामगोपाल वर्मा यांना कथन केला आणि या संपूर्ण विषयाने प्रभावित होऊन राम गोपाल वर्मा यांनी महासत्तांतर वर चित्रपट निर्माण करण्याबाबत रुची दाखवली आहे.तशा स्वरूपाचं त्यांचं ट्विटही त्यांनी लगोलग करून टाकलं. राम गोपाल वर्मांच्या ट्विटनंतर या पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडल्यात. अत्यंत ओघवत्या शैलीत आणि सोप्या भाषेत महाराष्ट्रातलं राजकीय सत्तांतर उलगडवून सांगणाऱ्या या पुस्तकाची प्रत संपादक चंद्रशेखर कुलकर्णी आणि प्रकाशक आनंद लिमये यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केली. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव प्रभाकर काळे यांनी पुस्तकाचे लेखक राजेश कोचरेकर यांना दूरध्वनी करून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा निवासस्थानी येण्यासाठीचा निरोप दिला.

गेले अनेक दिवस आमदार, खासदार, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांची गर्दी होत आहे. अशीच गर्दीची वेळ राजेश कोचरेकर यांना मिळाल्यामुळे काही काळ त्यांना प्रतीक्षा करावी लागली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बैठका सुरू होत्या. त्याच वेळी काही आमदारही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करत होते. या भेटीगाठी आणि बैठका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ʼमहासत्तांतरʼचे लेखक राजेश कोचरेकर यांना भेटीसाठी वेळ दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हसतमुखाने लेखक कोचरेकर यांचे स्वागत करत शिंदे म्हणाले, सध्या प्रचंड धावपळ सुरु आहे. काम कित्येक पटीनं वाढलेलं आहे. त्यामुळे स्वतःसाठी पाच मिनिटंही काढता येत नाहीत. त्यामुळे प्रकाशकांकडून आणि संपादकांकडून वेळेवर पुस्तक मिळूनही पूर्णपणे वाचता आलेलं नाही. अशी प्रांजळ कबुली देतानाच मितभाषी असलेले शिंदे पुढे म्हणाले, मी एकाच बैठकीत पुस्तकाची ४० पानं वाचून काढली आहेत. पुस्तकाची सोपी भाषा आणि ओघवती शैली ही मला खूपच भावली आहे.

“माझ्या वडिलांवर जे आरोप करण्यात आले आहे ते…”, विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची प्रतिक्रिया

आपल्याच आयुष्यात घडून गेलेल्या घटना शब्दबद्ध झालेल्या वाचताना एक वेगळाच अनुभव मिळत होता. त्यातलं नाट्य समजून घेताना पुस्तक खाली ठेवावं असं वाटतच नव्हतं. पण कामांचा डोंगर आवासून समोर उभा होता. त्यामुळे नाईलाजाने ४० पानांनंतर नाईलाजास्तव थांबावं लागलं. पण लवकरच मी अख्ख पुस्तक वाचून पूर्ण करणार आहे. पुस्तक पूर्ण झालं की पुन्हा एकदा मी आपल्याला भेटणार आहे असं आश्वासन देत शिंदे म्हणाले,साधारणपणे काम करताना किंवा राजकीय आयुष्य जगताना अनेक गोष्टी आपल्या हातून निसटत असतात. आणि त्या कुणीतरी टिपत असतं. याचं आपल्याला भान नसतं. या पुस्तकातील ४० पानांच्या वाचनातच जगण्यातून सुटणाऱ्या आणि वावरताना राहून गेलेल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या” असंही शिंदें म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक राजकीय नेत्यांनी हे पुस्तक मन लावून वाचण्याला पसंती दिली आहे. त्यामध्ये महासत्तांतराच्या नाट्यात एक महत्त्वाचा टप्पा असलेले भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांचा कोटा नसतानाही प्रसाद लाड यांना मोठ्या कल्पकतेने आणि हिमतीने विजयी करत विधान परिषदेच्या सभागृहात पोचविण्याचा पराक्रम केला. या विजयामुळेच महासत्तांतराच्या नाट्याला विलक्षण कलाटणी मिळाली. तसेच देवेंद्र फडणवीस या कुशाग्र बुद्धिमानी नेत्याचा एक वेगळाच दरारा राजकीय वर्तुळात तयार झालाय. त्या भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या पुस्तकाच्या बहुतांश प्रकरणांचा अवघ्या दोन-तीन बैठकांमध्येच फडशा पडला आहे. नुकताच प्रसाद लाड यांनी आपल्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर युरोपाचा दौरा केला. या दौऱ्यातही त्यांनी आपल्या सोबत महासत्तान्तर हे पुस्तक नेलं होतं. तिथेही या पुस्तकाचं वाचन करणाऱ्या प्रसाद लाड यांनी सांगितलं,वाचकाला सोपी आणि सुटसुटीत वाटणारी भाषा आणि नाट्य विशद करणारी निवेदनात्मक शैली आपल्याला खूपच आवडल्याचं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं.

Exit mobile version