spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा दावा, चंद्रपुरात सोन्याचे साठे

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे सापडल्याचा सुतोवाच नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे सापडल्याचा सुतोवाच नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभाग म्हणजेच जीएसआयने ही त्यास दुजोरा दिला असून त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बाम्हणी परिसरात सोन्याचे साठे असल्याचं सांगितलं आहे. त्या शिवाय भंडारा जिल्ह्यातील खैरी इटवाही, भीमसेन किल्ला परिसरात तसेच गरारा-मडकी परिसरात ही जमिनीच्या आत सोन्याचे साठे असण्याची शक्यता जीएसआयच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील काळ्या माती खाली दगडामध्ये सोन्यासह इतर मौल्यवान धातू लपल्याचे समोर आले आहे.

आता प्रश्न असा आहे की जमिनीचे आत असलेले सोन्याचे साठे पुरेशा प्रमाणात आहेत की नाही. कारण त्यावरच तिथे व्यवसायिक स्वरूपात उत्खनन शक्य आहे की, नाही हे स्पष्ट होणार आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी भूगर्भात कोणकोणते धातू आहेत, याचा अभ्यास करून संबंधित ठिकाणी सोन्याचे साठे असल्याचे अहवाल सरकारला दिले आहे. आता संबंधित ब्लॉकचा लिलाव कधी आणि कोणाला करायचा हे सरकारच्या हातातला विषय आहे. एकदा संबंधित ब्लॉक कुठल्याही खाजगी कंपनीला बहाल करण्यात आल्यानंतर या तिन्ही परिसरात सोन्याचे प्रत्यक्ष उत्खनन शक्य होणार असल्याचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे म्हणणे आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने अनेक वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील खैरी इटवाही व भीमसेन किल्ला परिसरात ही सर्वेक्षण केले होते. तेव्हा भूगर्भात त्या ठिकाणी अनेक महत्वाचे धातू असल्याचे समोर आले होते. त्यामध्ये सोनं, तांबा आणि टंगस्टन असल्याचा अहवाल भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने राज्य सरकारला दिला आहे. त्याशिवाय भंडारा जिल्ह्यातील गरारा – मडकी परिसरातही भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. त्या ठिकाणी सोनं आणि टंगस्टन असल्याचे समोर आले होते. त्या संदर्भातला अहवाल ही सप्टेंबर २०१५ मध्येच राज्य सरकारला देण्यात आला आहे.

नुकतच भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील बाम्हणी परिसरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार बाम्हणी परिसरात जमिनीमध्ये सोने आणि बेसमेटल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाम्हणी परिसरातील सोने असलेले भाग ५.९ वर्ग किमी परिसरात विस्तारलेले आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील परसोडी, कीटाळी आणि मरूपार परिसरात भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने अनेक वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. मात्र तिथे जमिनीखाली सोन्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा : 

सोनाली कुलकर्णीचे लंडन मधील काही खास फोटो

केंद्रीय विद्यालयात तेरा हजारहून अधिक रिक्त जागा, 12वी उत्तीर्ण असलेल्यां देखील संधी, पगार असेल…

कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संयमी मार्गाने पुढं जाऊ- शंभुराज देसाई

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss